भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडित तरूणीची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे सध्या याप्रकरणी आरोपी आणि भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले असून या वादामध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने उडी घेतली आहे. पायलने एक व्हिडीओ शेअर करत कुलदीप सिंह सेंगर यांचं समर्थन केलं आहे. तिच्या या व्हिडीओनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

‘या बलात्काराची कथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटातून घेतल्यासारखंच वाटत आहे. सोशल मीडियाच्या युगामध्ये भाजपा असो किंवा अन्य कोणताही पक्ष ते उघडपणे कोणीही दादागिरी करु शकत नाही. एकतर तो आधीच तुरुंगात होता, असं करून तो स्वतः भोवतीच फास आवळत आहे. कुलदीप सिंह सिंगर मुर्ख थोडीच आहेत, जे स्वत:वरच असं संकट ओढवून घेतील. खरं तर हे भाजपा पक्षातील आमदार किंवा मान्यवर लोकांविरोधात रचलेलं कारस्थान आहे’, असं म्हणत पायलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये तिने साक्षी मिश्रा प्रकरणाचाही उल्लेख केला असून हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी वाढवून दाखविल्याचं तिने म्हटलं आहे. सोबतच तिने वृत्त वाहिन्यांना ‘भारतीय माध्यमांचे काका आणि काकू’ असं म्हटलं आहे. पायलच्या या व्हिडीओनंतर तिच्यावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे.

दरम्यान, मागच्यावर्षी नोकरीच्या निमित्ताने १७ वर्षीय पीडित तरुणी कुलदीप सिंह सेंगरला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने बलात्कार केला असा आरोप तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. तर तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.