रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे या बँकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या आहेत. त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका व काही पत संस्थांचाही समावेश आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा रातोरात निर्णय झाला आणि येस बँक खातेदारांना त्यांच्या खात्यातून केवळ ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल, अशी मर्यादा घालण्यात आली. त्यामुळे सध्या अनेक खातेदारांचे पैसे या बँकेत अडकले आहेत. त्यातच अभिनेत्री पायल रोहतगीच्या वडिलांचेही पैसे या बँकेत अडकले असून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

अभिनेत्री पायल रोहतगी कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत असते. बऱ्याच वेळा ती हिंदू धर्माशी निगडीत पोस्ट शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलही व्हावं लागतं. मात्र पायल या साऱ्याला कायमच सामोरी जाते. यावेळी पायलने Yes Bankशी निगडीत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तिची चर्चेत रंगत आहे.

पायलने एक Yes Bankशी निगडीत पोस्ट शेअर करत सरकारची मदत मागितली आहे. यापूर्वीदेखील पायलने अनेक पोस्ट करत सरकारची मदत मागितल्याचं पाहायला मिळालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Yes Bank वर आर्थिक निर्बंध लादले असून येस बँकेच्या खातेदारांना ५ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त ५० हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. या बँकेत पायलचे वडील शशांक रोहतगी यांचेदेखील २ कोटी रुपये अडकले आहेत.

वाचा : ‘बागी 3’ची ‘तान्हाजी’वर मात; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस

शशांक रोहतगी यांचं अहमदाबादमधील सुभाष चौक या ठिकाणी असलेल्या येस बँकेच्या शाखेत खातं आहे. यात त्यांचे २ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे ही रक्कम एवढ्या लवकर काढणं शक्य नसल्याचं तिचं म्हणणं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलतानाही तिने याविषयी सांगितलं.
माझ्या वडिलांचं गुरुग्राममधील येस बँकेच्या खात्यात पैसे होते. मात्र त्यांनी ७ वर्षांपूर्वी हे खातं अहमदाबादमधील शाखेत ट्रान्सफर करुन घेतलं. निवृत्ती घेतल्यापासून ते अहमदाबादमध्येच राहत आहेत. त्यांना कर्करोग असून इतक्या कमी कालावधीमध्ये त्यांना बँकेतून पैसे काढणं शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही हे पैसे इतर बँकेत ठेवण्याची प्रक्रिया सुरु करणार होतो. मात्र त्यापूर्वीच आरबीआयकडून घोषणा करण्यात आली, असं पायल म्हणाली.

वाचा : ‘हवा येऊ द्या’मधील हा कलाकार चित्रपटात साकारणार खलनायकाची भूमिका

दरम्यान, आरबीआय बँकेने निर्बंध घातल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला बँकेतील त्याला बचत, ठेव अथवा चालू खात्यातून केवळ ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल हे निर्बंध गुरुवार, सायंकाळी ६ वाजल्यापासून, ३ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहतील. म्हणजे येस बँक खातेदारांना त्यांच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी ३ एप्रिलपर्यंत फक्त ५० हजार रुपये मर्यादेपर्यंत रक्कम काढता अथवा अन्य खात्यात हस्तांतरित करता येणार आहे. विशिष्ट परिस्थितीत म्हणजे वैद्यकीय उपचार, लग्न कार्य, शिक्षणासाठी करावयाचा खर्च वगैरे ठोस कारण सप्रमाण सिद्ध केल्यास, ५० हजारापेक्षा अधिक मर्यादेत रक्कम ठेवीदारांना काढता येईल, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.