‘पिपली लाइव्ह’चे सह- दिग्दर्शक मेहमूद फारुकीला दिल्लीतील साकेत न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमेरिकन संशोधक महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली मेहमूद फारुकीला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अमेरिकन महिलेवरील बलात्काराच्या प्रकरणात दिल्लीतील साकेत न्यायालयाने ‘पिपली लाइव्ह’ चित्रपटाचे सह दिग्दर्शक महमूद फारूकीला शनिवारी दोषी ठरविले होते. मागील वर्षी दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय अमेरिकन महिलेने महमूद फारुकी याच्या विरोधात बलात्काराची लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फारुकी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. अमेरिकन महिलने मार्च २०१५ मध्ये फारुकी याने आपल्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले होते. संबंधित पीडित महिला भारतीय चित्रपटावर संशोधन करण्यासाठी दिल्लीमध्ये आली होती. चित्रपटाच्या संशोधनासाठी आलेल्या पीडित महिलेला आपल्या दिल्ली येथील घरी बोलावून दारुच्या नशेत फारुकीने तिच्यावर बलात्कार केला होता. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिपली लाइव्ह’ या चित्रपटाचे फारुकीने सह दिग्दर्शन आणि लेखन केले होते.