रोहित शेट्टी आज बॉलिवूडमधील आघाडिच्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा आज अनेक कलाकार व्यक्त करताना दिसतात. अशीच इच्छा अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने देखील व्यक्त केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे एका मालिकेतून निर्माण झालेल्या वादंगामुळे तेजस्वीची ही इच्छा आता पुर्ण झाली आहे. ती रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वीने हा संपूर्ण किस्सा सांगितला. तीन वर्षांपूर्वी ती ‘पहरेदार पिया की’ या मालिकेमध्ये काम करत होती. या मालिकेत तिचं लग्न एका नऊ वर्षांच्या मुलासोबत होतं. किंबहूना हेच त्या मालिकेचं मुख्य कथानक होतं. आजवर आपण लहान मुलींची लग्न पुरुषांसोबत होताना अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. परंतु एका तरुणीचं लग्न नऊ वर्षांच्या मुलासोबत होते हे पहिल्यांदाच दाखवले जात होते. वेगळ्या संकल्पनेमुळे ही मालिका त्यावेळी चांगलीच चर्चेत होती. त्याचवेळी ती रोहित शेट्टीच्या एका चित्रपटासाठी सुरु असलेल्या ऑडिशनसाठी ती गेली होती. ‘पहरेदार पिया की’ या मालिकेमुळे तेजस्वीला रोहितने लगेच ओळखलं. या मालिकेचे काही भाग त्याने पाहिले होते. यातील तिचा अभिनय पाहून रोहित प्रभावित झाला होता. त्यामुळे तिला रोहितच्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटाचं नाव काय? हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार? याबाबत कुठलीही माहिती तिने दिली नाही. सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु आहे. लवकरच या चित्रपटाची घोषणा स्वत: रोहित करेल असे ती म्हणाली. तेजस्वी प्रकाश रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्य देखील झळकली होती.