इंटरनेटच्या महाजालातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान करतो. ‘टुमॉरोज वर्ल्ड’ ही आगामी भागाची थीम असल्यामुळे यावर बोलण्यासाठी सुंदर पिचाई यांच्याव्यतिरिक्त दुसरी योग्य व्यक्ती असूच शकत नाही.

वाचा : प्रियांकाने सांगितले सर्वाधिक मानधन मिळण्यामागचे कारण..

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुंदर पिचाई कार्यक्रमात हिस्सा घेतील. यावेळी पिचाई यांनी बॉलिवूडची प्रशंसा करत त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दलही सांगितले. केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध असलेला शाहरुख खानच्या अभिनयाची भुरळ पिचाई यांनाही पडली आहे. ते म्हणाले की, ‘हिंदी चित्रपटांची लोकप्रियता जगभरात आहे. सर्वच जण शाहरूखला ओळखतात. मात्र, ‘हॅप्पी न्यू ईयर’ चित्रपटासाठी २०१४ मध्ये शाहरुखसोबत माझी मुलाखत घेण्यात आली आणि त्यानंतर लोक मला ओळखू लागले. त्याचे काम चांगले आहेच पण त्याहीपेक्षा तो खूप चांगला आहे.’ त्याचबरोबर पिचाई म्हणाले की, भारतातील प्रत्येकाने स्मार्टफोनचा वापर करावा आणि ‘इंटरनेट साथी’च्या माध्यमातून संपर्कात रहावे.

भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. आयआयटी खरगपूरमधून त्यांचे अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर म्हणून ओळख असलेले पिचाई, गेल्या अनेक वर्षांपासून गूगलमध्ये कार्यरत आहेत. गुगलचा क्रोम ब्राऊझर तयार करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. २००८ साली त्यांच्यात नेतृत्त्वाखालील टीमने गुगल क्रोम ब्राऊझर महाजालात उपलब्ध करून दिला होता.

Aapla Manus First Look वाचा : ‘हा सैतान बाटलीत मावनार नाय’

‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’ शोच्या ‘टुमॉरोज वर्ल्ड’ एपिसोडचे प्रसारण येत्या रविवारी होईल. याआधी जावेद अख्तर, गुरमेहर कौर, स्नेहा जैन या व्यक्तींनी ‘टेड टॉक्स इंडिया नई सोच’मध्ये उपस्थिती लावली होती.