करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत देशवासीयांच्या मदतीसाठी सेलिब्रेटींनी मदतीचा पुढे केला आहे. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. आतापर्यंत त्याने एक हजारांपेक्षा अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे. या पार्श्वभूमीवर आसाममध्ये अडकलेल्या काही लोकांनी सोनू सूदकडे मदत मागितली. सोनूने देखील आता कुटुंबियांना भेटण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

अवश्य पाहा – बिग बींचा ‘गुलाबो सिताबो’ पुन्हा एकदा वादात; लेखिकेवर पटकथा चोरीचे आरोप

अवश्य पाहा – वर्णद्वेषी आंदोलनाला ‘पोकेमॉन’चा पाठिंबा; जाहीर केली ७५ लाख रुपयांची मदत

“कृपया जिथे आहात तिथेच थांबा. तुमच्या मदतीसाठी मी कोणाला तरी पाठवत आहे. तुमची त्वरीत मदत केली जाईल. आता घरी जाऊन कुटुंबियांना भेटण्याची वेळ आली आहे. धन्यवाद.” अशा आशयाचे ट्विट करुन सोनू सूदने त्या लोकांना मदतीचे आश्वासन दिले. सोनूचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी यासाठी सोनूचे कौतुक देखील केले आहे.

सोनूने सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.