करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या वाढत्या विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाउन जारी करण्यात आला. परंतु या लॉकडाउनमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची.
लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या गरीब मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी सोनू सूदने स्विकारली आहे. शेवटचा मजूर त्याच्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही अशी जणू प्रतिज्ञाच त्याने केली आहे. परिणामी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बिहारमधील सिवान येथे सोनूची चक्क मुर्ती तयार केली जाणार आहे. प्रफुल कुमार या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली. यावर सोनूने प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मुर्तीवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांचा वापर गरीबांची मदत करण्यासाठी करा.” अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
भाई उस पैसे से किसी गरीब की मदद करना। https://t.co/SI9MqVpRRe
— sonu sood (@SonuSood) May 25, 2020
सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.