सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येणं कठीण आहे. या व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये कधी व्हिडिओ असतात, कधी मिम्स तर कधी एखाद्याला टार्गेट करुन होणारं ट्रोलिंग. रविवारपासून असाच एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे.
‘लय भारी’या फेसबुक पेजने अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये चक्क प्रियंका चोप्रा दिपिका पादुकोणला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ म्हणत डिवचताना दिसत आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमामधील ‘पिंगा’ गाण्यामधील काही भाग एडिट करण्यात आला आहे. या गाण्यामध्ये दिपिका आणि प्रियंकाच्या नृत्यामधील खऱ्या गाण्याऐवजी ‘झी मराठी’वरील लोकप्रिय असणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे शिर्षकगीत एडिट करण्यात आले आहे. ‘मनोज शिंगस्टे एडिटींग’ नावाच्या युट्यूब चॅनवरील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओची एडिटींग या दोघींच्या नृत्यावर खरोखरच इतकी योग्य पद्धतीने जुळवण्यात आली आहे की अनेकांनी कमेन्ट्समधून व्हिडिओ एडिटरची स्तुती केली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमामध्ये बाजीराव यांच्या पत्नीची भूमिका प्रियंकाने केली आहे. बाजीराव हे मस्तानीला पुण्यात घेऊन येतात त्यानंतर सिनेमामध्ये हे गाणे आहे. सिनेमातील कथानकानुसार याचवेळी प्रियंकाला बाजीराव आणि मस्तानीमधील नात्याबद्दलची शंका सत्य असल्याची जाणीव होते. याच पार्श्वभूमीवर सिनेमामध्ये हे गाणे येते. म्हणूनच अनेकांना या गाण्यावर बसवलेले ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे शिर्षकगीत अधिक आवडल्याचे चित्र दिसत आहे.
अवघ्या चार दिवसांमध्ये हा व्हिडिओला फेसबुकवर चार हजार जणांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला एक लाख नव्वद हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेन्ट करुन हे एडिटींग भन्नाट झाल्याचे मत नोंदवत व्हिडिओ एडिटरची स्तुती केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 13, 2018 4:29 pm