बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातील घराणेशाही, गटबाजी असे अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कलाविश्वात त्यांना मिळालेल्या वागणुकीवर भाष्य केलं आहे. यामध्येच आता लोकप्रिय अभिनेता पियुष मिश्रा व्यक्त झाले आहेत. ‘कलाविश्वात घराणेशाही किंवा कोणत्याही ठराविक फॅमेलीचं अधिराज्य नाही, मात्र येथे दादागिरी नक्कीच चालते’, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

“कलाविश्वात घराणेशाही किंवा एका ठराविक कुटुंबाचं वर्चस्व आहे असं मी म्हणणार नाही. जर खरंच तसं काही असं तर आज माझी प्रगती झाली नसती.माझा मार्गात कधीच कोणता अडथळा आला नाही. त्यामुळे मला कधी कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागलं नाही. जोपर्यंत मी कोणताही मुर्खपणा केला नव्हता तोपर्यंत माझ्यासोबत सगळं चांगलं चाललं होतं. मात्र अशा एक-दोन घटना घडल्या ज्याच्यामुळे मला चांगलाच अनुभव आला. मुळात ते माझ्या चुकीमुळे झालं होतं. मी करारपत्र नीट वाचलं नव्हतं त्यामुळे मला काही गोष्टी सहन कराव्या लागल्या. मात्र आज मी ज्या स्थानावर आहे ते माझ्या स्वकर्तृत्वामुळे आणि त्या लोकांमुळे ज्यांनी मला संधी दिली”,असं पियुष मिश्रा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “मला नाही वाटतं की कलाविश्वात घराणेशाही किंवा ठराविक कुटुंबाचं राज्य आहे. पण कलाविश्वात दादागिरी नक्कीच आहे. मी मोठा कलाकार आहे. मात्र तरीदेखील तू माझा आशीर्वाद घेतला नाहीस. मी आलो तेव्हा तू माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असं म्हणणारे अनेक जण आहेत.”

दरम्यान, पियुष मिश्रा हे लोकप्रिय अभिनेता असण्यासोबतच उत्तम गीतकार,लेखक, संगीतकारदेखील आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तसंच कलाविश्वातदेखील खळबळ उडाली आहे. यात अनेक कलाकारांनी रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला आहे. तर काही कलाकारांनी सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.