लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय यामध्ये मोदींची भूमिका साकारत आहे. ‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’ यांसारख्या बायोपिकचे दिग्दर्शन करणाऱ्या ओमंग कुमारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ओमंगचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच बायोपिक नाही. पण ‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’सारखी जादू ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पाहायला मिळत नाही. पटकथेसोबतच अभिनय, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी यांमध्येही बरीच कमतरता जाणवते. त्याचसोबत मोदींच्या जीवनातील वादविवाद आणि चढउतार यांचं संतुलन चित्रपटात राखता आलं नाही.

विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका ठीकठाक साकारली आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात मोदींची रॅली आणि त्यांचा पंतप्रधान होण्याच्या आधीचा काळ दाखवण्यात आला आहे. यादरम्यान मोदींच्या भाषणाची दृश्ये उत्तमरित्या चित्रीत करण्यात आली आहेत. या दृश्यांमधील भाषेवरील पकड आणि मोदींचा अंदाज विवेकने प्रभावीपणे कॉपी केलं असं म्हणायला हरकत नाही. तर दुसरीकडे त्याचा लूक मोदींशी हुबेहूब दिसण्यावर जास्तीत जास्त भर दिला गेला. मात्र हा प्रयत्न तितका यशस्वी ठरत नाही.

अभिनयाच्या बाबतीत कलाकारांनी भूमिकांना त्यांच्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी चित्रपटाची पटकथा कमकुवत ठरते. इतर कलाकारांना चित्रपटात फारसा वाव मिळाला नसून संपूर्ण लक्ष विवेकवर केंद्रीत केलं होतं. तर बरीचशी दृश्ये चित्रपटात अनावश्यक वाटली.

मोदींच्या आयुष्यावरील चित्रपटासाठी आणखी दमदार संहिता, दिग्दर्शन आणि कलाकारांची आवश्यकता होती, ही गोष्ट चित्रपटाअखेर जाणवते.