|| नीलेश अडसूळ

एकाच व्यक्तीला दोन व्यक्तींनी आपला जोडीदार निवडण्याची परंपरा तशी पुराणापासून सुरू आहे. शंकर देवतेच्या पार्वती -गंगा, गणेशाच्या रिद्धी-सिद्धी असे संदर्भ असलेल्या देवतांच्या अनेक गोष्टी आढळतील. अगदी लोकदेवतांमध्ये विठ्ठलाच्या रुक्मिणी- सत्यभामा, खंडोबाच्या म्हाळसा-बानू अशा दोन पत्नींचा संसार देवांनाही करावा लागल्याचे दाखले मिळतात. संसाराच्या या गोष्टी कलियुगातही अनेकांना चुकल्या नाहीत, मग मालिकांना याची भुरळ न पडावी तर नवलच. एका माणसाच्या दोन बायका, एका स्त्रीचे दोन पुरुषांशी असलेले संबंध, विवाहबाह्य़ संबंध आणि त्याभोवती गुंफलेल्या कौटुंबिक कथांचे सत्र  मालिकाविश्वात अनेक दशकांपासून सुरू असल्याचे पाहायला मिळते. अर्थात अशा आशयाला प्रेक्षकांचीही भरभरून पसंती मिळते. अनेकदा कौटुंबिक मालिका म्हटल्यावर त्यात नायकाभोवती दोन नायिका असायलाच हव्यात, असा समज प्रेक्षकांमध्ये रूढ झाला आहे. दशकांचे दाखले कशाला अगदी आता सुरू असलेल्या मालिकांमधेही हेच चित्र पाहायला मिळते आहे.

‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचे आशय सूत्रच या संकल्पनेभोवती फिरते आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या राधिका आणि गुरुनाथच्या कथेत शनाया नावाची सवत येते आणि मालिकेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. दोन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या मालिकेतील विवाहबाह्य़ संबंधाचे नाटय़ दिवसेंदिवस अधिकच पुढे जाते आहे. इतर मालिकांबाबतीत काही भाग पुढे सरकल्यानंतर ‘सवत’ नायक-नायिकेचे आगमन होते; पण या मालिकेत मात्र कें द्रस्थानीच सवत असल्याचे दिसते. या मालिकेत वेंधळी म्हणून दाखवली गेलेली शनाया आता ‘स्मार्ट’ भूमिकेत आली आहे. सुडाच्या भावनेने पछाडलेल्या शनायाला गुरुनाथ आपला वापर करत असल्याची जाणीव अजून झालेली नाही. परंतु, सूड बुद्धीने शनायाने मिळवलेली राधिकाच्या कंपनीतली अर्धमालकी गुरुनाथच्या पथ्यावर पडणार की यातून पुन्हा शनायाचेच नुकसान होणार हे येणाऱ्या आगामी भागात समजणार आहे. मालकीण म्हणून शनायाला ‘राधिका मसाले’मधील लोक स्वीकारणार की तिची फजिती होणार? हे लवकरच उघड होईल. तूर्तास शनायाला अचानक आलेले शहाणपण पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत.

‘जागो मोहन प्यारे’ नंतर त्याच मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील म्हणजेच ‘भागो मोहन प्यारे’तील कथा काहीशी बदलली आहे. परीऐवजी एक सुंदर चेटकीण मोहनच्या मागे लागली आहे. गेल्या पर्वात संसारी असलेला मोहन या पर्वात अजूनही अविवाहित दाखवला आहे. प्रत्यक्षात जरी मालिकेत सवतींचा संसार नसला तरी मोहनभोवती दोन बायकांचा दरारा असणार हे मात्र नक्की. मधुवंती चेटकीण मोहनच्या प्रेमात तर मोहन गोडबोले बाईंच्या प्रेमात असल्याने प्रेमाचा रंजक त्रिकोण या मालिकेत पाहायला मिळतो आहे. चेटकिणीने मोहनला गोडबोले बाईंपासून दूर करण्यासाठी केलेली जादू मोहनला गोडबोलेबाईंपासून दूर करणार की अधिक जवळ आणणार, हे मात्र एवढय़ात उघड होणार नाही. परंतु मधुवंती आणि गोडबोलेबाईंच्या विळख्यात सापडलेल्या भोळ्या मोहनची होणारी फजिती मात्र आगामी भागात प्रेक्षकांना हसण्यासाठी भाग पडणार आहे.

‘कलर्स मराठी’वरील ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत अक्षय आणि अमृताच्या संसारात कियारा नावाचे वादळ कधी येईल असा प्रेक्षकांनी विचारही केला नव्हता. कौटुंबिक कुरघोडींभोवती फिरणाऱ्या या मालिकेत अमृताची सवत  कियाराचे आगमन झाले आणि मालिका वेगवेगळ्या वळणांवरून पुढे पोहचली. पुढे अमृताला मिळालेली सासरकडच्यांची साथ, कियाराचे अक्षयला भुरळ पाडणे, कियाराने घाडगेंच्या घरात जाऊ न मिळवलेले सुनेचे अधिकार आणि त्यानंतर झालेल्या कट कारस्थानांनी मालिकेतला सवतनामा अधिकच रंगत गेला आणि मालिकेचे बरेच भाग प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात पुढे गेले. सध्या मालिकेत सुरू असलेल्या कियारा प्रकरणावर पूर्णविराम लावत मालिका अक्षय-अमृताच्या संसाराकडे वळली आहे. आता कुठे अक्षय-अमृताचा संसार सुखी होणार अशी आशा करत असतानाच चित्रा नावाची नवी सून घाडगेंच्या घरात आली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी घरात आलेल्या चित्राचे अस्तित्व अमृताला घराबाहेर काढणार की अमृता तिचे खरे रूप सर्वासमोर आणणार यावर आगामी भाग रंगणार आहे. येत्या भागांमध्ये माईंच्या सांगण्यावरून अमृता चित्राची माफी मागणार आहे. माफी मागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून माई आणि अमृतामध्ये फूट पडेल की काय असा संभ्रम सध्या निर्माण झाला आहे.

‘हे मन बावरे’ या मालिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अनु आणि सिद्धार्थचे लग्न झाले असले तरी त्यांच्याही नात्यांमध्ये सान्वीच्या रूपाने सवतनामा सुरूच आहे. दोघांचे लग्न मोडण्यासाठी सान्वीने अनेक प्रयत्न केले, परंतु तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाचे सूत जुळू शकले नाही. अनूचे वैधव्य आणि सिद्धार्थचे अनिवार असणारे प्रेम यामध्ये सान्वीच्या रूपाने सुरू झालेला सवतनामा आता त्यांच्या सुखी संसारात डोकावू पाहतो आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी सान्वी आता दुर्गाबाईंना हाताशी धरताना पाहायला मिळणार आहे. स्वत:ला कणखर आणि चतुर समजणाऱ्या दुर्गाबाईंना कोंडीत पकडण्यात सान्वी यशस्वी होईल का किंवा तिच्या कारस्थानाने अनु-सिद्धार्थच्या संसारात नवे वादळ येईल का?,  हे आगामी भागात दिसणार आहे.

‘सोनी मराठी’ वरील ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत सवतनामा नसला तरी नायिके भोवती फिरणारे दोन नायक मात्र पाहायला मिळत आहेत. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करायला पोलीस खात्यात आलेली अवनी भोसले तिच्या कामांमुळे कधी सर्वांच्या कौतुकाचा विषय होते तर कधी गोत्यात येताना दिसते आहे. तिच्या या प्रवासात सोबत असणाऱ्या पत्रकार पुष्कराज लोखंडेच्या काहीशी प्रेमात पडलेली ती दिसते आहे. तर दुसरीकडे अवनीच्याच पोलीस ठाण्यात तिच्या वरिष्ठ पदावर काम करणारा संकेतही  तिच्या प्रेमात असल्याचे दिसते. अवनीच्या लग्नाचे काय होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मालिकेतील हा त्रिकोण मात्र प्रेक्षकांना अवनीच्या लग्नाची आशा लावून गेला आहे. परंतु या प्रेमप्रकरणांना खत पाणी न घालता मालिका आता वेगळ्या वळणावर जाते आहे. अवनी आता स्पर्धा परीक्षांची तयारी करून लवकरच पीएसआय होताना आगामी भागात दिसणार आहे. तर ‘मी तुझीच रे’ या मालिकेतील जयदत्त आणि रियाचे खोडसाळ नाते आता पुढे सरकते आहे. दोघांमध्ये चालणाऱ्या कुरघोडी आता घरापर्यंत येऊ न पोहोचल्या आहेत. दोघांमध्ये भांडण असले तरी पुढे याचे प्रेमात रूपांतर होणार यात मात्र शंका नाही. परंतु जयदत्तच्या शेजारी राहणारी प्रियांकाही त्याच्यावर तितकेच प्रेम करते. आता दोघांच्या नात्यात प्रियांकाची लुडबुड होणार की रिया आणि जयदत्तचे खुलणारे नाते प्रियांकाला बाजूला करणार हे आगामी भागात पाहायला मिळेल. प्रेमाचा हा त्रिकोण आता तरी अस्पष्ट असला तरी येणाऱ्या काही भागात प्रियांका हे पात्र अधिक स्पष्ट होऊ न याही मालिकेत सवतनामा सुरू होईल का हे मात्र आता प्रेक्षकांनी पहायचे आहे.

मालिकांमध्ये सुरू असलेला हा सवतनामा वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून कायम दाखवला जातो आणि पुढेही दाखवला जाईल. सवतनामा जरी स्पष्ट होत नसला तरी एका नायकाभोवती दोन नायिका आणून किंवा नायिकेभोवती दोन नायक आणून मालिका रंजक करण्याचे धोरण सर्वच वाहिन्यांना कायम नफ्याचेच ठरले आहे.