छोट्या पडद्यावरील ‘कुमकुम भाग्य’ ही मालिकाही सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असून तिचेही पुन्हा प्रसारण सुरू झाले आहे. नव्याने सुरू झालेल्या या मालिकेच्या कथानकाला काही अनपेक्षित वळणे मिळाली आहेत. नवीन रियाच्या भूमिकेद्वारे पूजा बॅनर्जी ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीचा मालिकेत समावेश करण्यात आला असून तिने कथानकात उत्सुकता निर्माण केली आहे. आता पूजाने सामाजिक विषयावर तिचे मत मांडले आहे.

विवाह आणि सहजीवन हा जीवनाचा एक भाग आहे. पण विवाह झाला म्हणजे कारकीर्द संपली असा त्याचा अर्थ होत नाही असे पूजा म्हणाली आहे. “माझ्या आईने आपली नोकरी आणि घरकाम हे किती सहजतेने आणि कार्यक्षमतेने हाताळले होते, ते पाहातच मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे मला जीवनाकडून जे हवं आहे, ते मिळालंच पाहिजे अशी जिद्द माझ्यात निर्माण झाली आहे” असे पूजा म्हणाली.

“मी अभिनय करू लागले. त्यानंतर मी लग्नाचा निर्णय घेतल्यावर माझ्या कुटुंबियांनी मला तो निर्णय पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. त्यांना वाटत होतं की मी विवाहित झाले, तर मला नव्या भूमिका मिळणार नाहीत. पण मी तेव्हा माझ्या कुटुंबियांना नीट समजावलं की माझा विवाह माझ्या अभिनय कारकीर्दीच्या आड येणार नाही. मी जर चांगली अभिनेत्री असेन तर मला नव्या भूमिका मिळतच राहतील. आता माझ्या लग्नाला तीन वर्षं झाली असून माझी कारकीर्दही चांगली बहरली आहे आणि माझं कुटुंबही सुखात आहे!” असे पूजा पुढे म्हणाली.

पूजा पुढे म्हणाली, “अनेकांना असं वाटतं की घर सांभाळणं आणि करिअर करणं हे एका स्त्रीला खूप अडचणीचं आणि त्रासदायक ठरत असेल. मला स्वत:ला हे मत पटत नाही; म्हणूनच विवाहानंतरही काम सुरू ठेवणार्‍्या महिलांना नेहमी पाठिंबा देते. विवाह झाला म्हणजे आपली व्यावसायिक कारकीर्द संपली अशी समजूत असलेल्या मुलींना मी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते. विवाह हा जीवनाचा एक भाग आहे, निवृत्त होण्याचा संकेत नव्हे.”