दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री पूजा हेगडे इंडस्ट्रीबाबत तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने दाक्षिणात्य चित्रपटांविषयी प्रतिक्रिया दिली. “दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या नाभीचं आणि कटिभागाचं फार आकर्षण असतं”, असं ती या मुलाखतीत म्हणाली. या वक्तव्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्यानंतर आता पूजाने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी मी नेहमीच कृतज्ञ राहीन. माझी संपूर्ण मुलाखत पाहा आणि मग बोला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय’, असं तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित स्पष्ट केलं.
‘मुलाखतीतील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझी वक्तव्ये फिरवली जाऊ शकतात पण टॉलिवूडविषयी असलेलं माझं प्रेम कमी होणार नाही. तेलुगू फिल्म इंडस्ट्री ही नेहमीच माझ्यासाठी महत्त्वाची असेल. ज्यांना माझे चित्रपट आवडतात, त्या चाहत्यांनादेखील ही गोष्ट माहीत असेल. मी पुन्हा एकदा सांगते, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीची मी कायम ऋणी राहीन’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय.
View this post on Instagram
आणखी वाचा : अखेर भूषणने व्यक्त केल्या भाग्यश्रीबद्दलच्या प्रेमभावना?
तेलुगू चित्रपटांतील स्त्रियांच्या भूमिकेविषयी पूजाला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. तिच्या ‘अला वैकुंठपुरामुलू’ या चित्रपटाचं उदाहरण त्यात तिने दिलं. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या नाभीचं सर्वाधिक आकर्षण असल्याची कबुली देत नाभीपेक्षा स्त्रियांचे पाय पुरुषांना जास्त आकर्षित करू शकतात, असं ती मुलाखतीत म्हणाली. “चित्रपटात अल्लू अर्जुन माझ्या पायांकडे पाहून आकर्षित होत असल्याचं दाखवलंय. पण दिग्दर्शक त्रिविक्रम यांना मी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी काही दृश्ये अशीही त्यात समाविष्ट केली, ज्यामध्ये मी त्याच्या वागणुकीबद्दल त्याला शिक्षा देते”, असं तिने सांगितलं.