गेली दोन वर्षे सातत्याने चर्चेत राहिलेल्या एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे तिकीटबारीवर कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक भव्य चित्रपट बनवण्याचा एसएस राजमौली यांचा मानस पूर्ण झाला आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर चांगलेच वर्चस्व पाहायला मिळतेय. ‘बाहुबली २’ या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर सातासमुद्रापारही मोठे यश मिळाले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसातच या चित्रपटाने ५४० कोटी रुपयांची कमाई केली. प्रभासच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडण्यास सुरुवात केली. खान बंधूंपैकी दोन महत्त्वाचे आणि दमदार खान असलेल्या आमिर आणि सलमानच्या चित्रपटांचे विक्रम मोडून प्रभासने पहिल्याच दिवशी त्यांना मात दिली. पण, यातील तिसऱ्या महत्त्वाच्या खानचा विक्रम मोडीत काढण्यात प्रभासच्या चित्रपटाला अपयश आले आहे. तो म्हणजे बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान.

‘बाहुबली २’च्या हिंदी आवृत्तीने शुक्रवारी पहिल्या दिवशी ४१ कोटी रुपयांची कमाई केली होती. या कमाईने सलमानच्या ‘सुलतान’ला आणि आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटाला मागे टाकले. या चित्रपटांनी पहिल्या दिवशी अनुक्रमे ३६.५४ कोटी आणि २९.७८ कोटी रुपयांची कमाई केली होती. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी स्वतः ट्विट करून ही आकडेवारी जाहीर केलेली. मात्र, एकापाठोपाठ एक विक्रम रचणारा ‘बाहुबली २’ शाहरुख खानच्या ‘हॅप्पी न्यू इयर’चा विक्रम मोडू शकलेला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४५ कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतातील पुढचा आघाडीचा स्टार असलेल्या प्रभासला आता अजून थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. जेणेकरून, तो बॉलिवूडच्या बादशहाला बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांच्या संख्येत मात देऊ शकेल.

दरम्यान, अमेरिकन बॉक्स ऑफिसवरही ‘बाहुबली २’ला तिसरे स्थान मिळले आहे. अमेरिकेत केवळ ४२० स्क्रिन्सवर प्रदर्शित होऊनही चित्रपटाने तब्बल १० मिलियन डॉलरची कमाई केली आहे. आता या आठवड्याभरात चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण, आमिरच्या ‘पीके’ चित्रपटाने केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या विक्रमी कमाईला ‘बाहुबली २’ मात देतो की नाही ते यावरूनच कळेल.