प्रभुदेवा सुंदरम उर्फ प्रभुदेवाने आपल्या करिअरची सुरुवात एक डान्सर म्हणून केली आणि त्यांचा प्रवास अभिनेत्यापर्यंत येऊन पोहोचला. अभिनय क्षेत्रात त्याला फारसं यश मिळालं नाही. मात्र एक डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून त्याने मोठे नाव कमवले. एक यशस्वी नृत्यदिग्दर्शक म्हणूनही आज तो प्रसिद्ध आहेत. प्रभुदेवाला ‘भारताचा मायकल जॅक्सन’म्हणून ओळखलं जातं. मात्र त्याला हे नाव का पडलं या मागे एक रंजक किस्सा आहे.

आपल्या नृत्याने कोट्यावधी नर्तकांना वेड लावणाऱ्या प्रभुदेवाने ‘मोउना रागम’ या तामिळ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटामधील एका गाण्यात तो बासरी वाजविणाऱ्या एका मुलाच्या वेशात दिसून आला होता. या गाण्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. याचदरम्यान त्याला कमल हसन यांच्या ‘वेत्री विजा’ या चित्रपटामधून पहिल्यांदा कोरिओग्राफर म्हणून ब्रेक मिळाला. त्यानंतर त्याने तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड यासारख्या अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं. हा प्रवास सुरु असताना त्याने बॉलिवूडकडे वाटचाल केली.

‘हम से है मुकाबला’ या बॉलिवूडमधील चित्रपटातील एका गाण्यात प्रभुदेवाने अभिनेत्री नगमासोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘मुकाबला’ हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. या गाण्यातील प्रभुदेवाच्या डान्समुळे त्याच्या चाहत्यांची संख्या कमालीची वाढली होती. विशेष म्हणजे याच गाण्यामुळे त्याला ‘भारताचा मायकल जॅक्सन’ हे नाव मिळालं.

प्रभुदेवाचे वडीलदेखील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत प्रभुदेवाने या क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचे वडील साऊथ इंडियन फिल्म्समध्ये डान्स मास्टर होते. पित्याकडून प्रभुदेवा भरतनाट्यम आणि वेस्टर्न डान्स शिकला. प्रभुदेवाचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेन्द्र प्रसाद दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. खरे तर प्रभुदेवाला अॅक्टर व्हायचे होते. प्रभुदेवाने आपले करिअर एक डान्सर आणि अभिनेता म्हणून सुरू केले. मात्र अभिनयात त्याला फार यश गाठता आले नाही. प्रभुदेवाने आपल्या करिअरची सुरुवात डान्स कोरिओग्राफर म्हणून केली होती. मात्र नंतर त्याला अभिनय खुणावू लागला. प्रभुदेवा यांनी १०० हून अधिक चित्रपटाना नृत्य दिग्दर्शन केले आहे.