सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमधील करोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी शतक ओलांडले. शुक्रवारी दिवसभरात १५ नवे बाधित सापडले, तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील बाधितांची संख्या १०१ वर, तर मृतांची संख्या १० वर पोहोचली. या परिसरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. धारावीबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. दोन महिन्यांपूर्वी ती धारावीत शूटिंगसाठी गेली होती. तिथले लोक व त्यांची जीवनशैली जवळून पाहण्याचा अनुभव तिने घेतला. म्हणूनच त्यांच्यासाठी तिने ही खास पोस्ट लिहीली.

‘मी धारावीत फिरले. तिथल्या लोकांशी संवाद साधला, त्यांची जीवनशैली जवळून पाहिली. संपूर्ण जगात करोनाविरोधी जणू युद्धच सुरू आहे. पण विविध कारणांमुळे धारावीतील लोकांसाठी ही परिस्थिती खूप कठीण आहे. याविरोधात लढण्यासाठी तुम्हाला आणखी शक्ती, सामर्थ्य मिळो. आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू. विश्वास ठेवा’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

https://www.instagram.com/p/B_E8ox1D1d1/

आणखी वाचा : ‘अकाऊंट पुन्हा चालू करणार नाही’; ट्विटरला अमेरिकी प्लॅटफॉर्म म्हणत रंगोलीने घेतला निर्णय

धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आसपासच्या भागात करोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. आता करोनाचा संसर्ग माटुंगा लेबर कॅम्पमध्येही पोहोचला आहे.