‘राजनिती’, ‘चक्रव्ह्यूह’, ‘आरक्षण’ यांसारखे काही वास्तववादी चित्रपटांनंतर दिग्दर्शक प्रकाश झा यांनी वेब विश्वात पदार्पण केलं. ‘आश्रम’ ही त्यांनी दिग्दर्शित केलेली वेब सीरिज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिली. नोव्हेंबरमध्ये या सीरिजचा दुसरा भागसुद्धा प्रदर्शित झाला. एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली ही सीरिज १०० कोटी व्ह्यूज मिळालेल्या सीरिजमध्ये सहभागी झाल्याचा दावा प्रकाश झा यांनी केला आहे. दुसरा भाग प्रदर्शित होण्यापूर्वी पहिल्या भागाला ४० कोटी व्ह्यूज मिळाल्याची माहिती त्यांनी दिली होती.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “जनतेवर थेट परिणाम करणारे चित्रपट किंवा सीरिज बनविल्यास, त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया येणं हे अपेक्षितच असतं. या सीरिजचे व्ह्यूज वाढतच गेले आणि जेव्हा १०० कोटींचा आकडा मी ऐकला, तेव्हा थक्कच झालो. लोकांना अशा प्रकारचं कथानक पाहायला आवडतं हे मला समजलं.”

आणखी वाचा : ‘आता मी असं बसू शकत नाही पण..’; गरोदर अनुष्काची भन्नाट पोस्ट

या सीरिजचा दुसरा भागसुद्धा आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी आश्रम सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या सीरिजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप त्यांनी केला.