‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. आजही देशाच्या अनेक भागांत स्त्रियांना मोकळेपणाने व्यक्त होता येत नाही. विविध सामाजिक आणि आर्थिक परिस्थितींमध्ये महिलांची घुसमट होत असते. आयुष्यभर एका बंधनात जगणाऱ्या आणि सरतेशेवटी त्या बंधनांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या चार महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. स्वतःच्या लैंगिक भावनांना मुक्तपणे बाहेर येण्यासाठी वाट मोकळी करून देणाऱ्या महिलांची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे अभिनेत्री अहाना कुमरा विशेष चर्चेत आली होती.

‘झूम टिव्ही’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अहानाने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगितली. “या चित्रपटासाठी आम्ही सेक्स सीन शूट करत असताना एकदा निर्माते प्रकाश झा सेटवर आले. सेटवर आल्यानंतर त्यांनी माझ्या बोल्ड सीनवर टिप्पणी केली ज्यामुळे मला अवघडल्यासारखं झालं. मी लगेच आमची दिग्दर्शक अलंक्रिता श्रीवास्तवकडे गेले आणि तिला म्हणाले की, जरी ते निर्माते असले तरीही ते माझे दिग्दर्शक नाहीत तर मी त्यांच्याकडून अशी टिप्पणी का ऐकून घ्यावी?”

अहानाने पुढे असेही सांगितले की, “माझी कुचंबणा झाल्याचे पाहून अलंक्रिताने सुद्धा प्रकाश झांना सेटवरून निघून जाण्याची विनंती केली आणि ते गेले. त्यांनी हे समजून घेतले की त्यांच्यामुळे मी अस्वस्थ झाले होते. निर्माते असूनसुद्धा अत्यंत नम्रपणे परिस्थिती समजून घेऊन ते सेटवरून निघून गेले हा त्यांचा मोठेपणा आहे.”

या चित्रपटात अहानासोबतच रत्ना पाठक शहा, कोंकना सेन शर्मा आणि प्लबिता बोरठाकूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.