संपूर्ण देशातील लोक सध्या करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही गुजरात आणि बिहार येथे निवडणूकांची जय्यत तयारी सुरु आहे. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणूक तर बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला आहे. या प्रचारावरुन अभिनेता प्रकाश राज संतापले आहेत.

काय म्हणाले प्रकाश राज?

“मजुर लॉकडाउनमध्ये पायी चालत आहेत. मध्यमवर्गीयांचे प्राण कंठाशी आले आहेत. अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. परंतु राजकारणी मंडळी मात्र आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. गुजरामधील आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले आहे.” अशा आशयाचे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते मुक्तपणे प्रतिक्रिया देत असतात. यावेळी त्यांनी गुजरात आणि बिहारच्या निवडणूकीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.