“अशा अराजकता पसरवणाऱ्या नेत्यांना आपण मतदान करतो.” असे म्हणत अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्ली हिंसाचारावर संताप व्यक्त केला आहे. ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’ (CAA) वरून दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. तेथील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. उलट देशातील राजकीय पक्षांमध्ये मात्र आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ४० पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संपूर्ण प्रकाराला आपण स्वत:च जबाबदार आहोत असं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले प्रकाश राज?

“ज्यांनी या रानटी वृत्तीला मतं देऊन सत्तेत बसवलं, त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे… एक समाज म्हणून आपली काय अवस्था झाली आहे!!” अशा आशयाचं ट्विट करुन प्रकाश राज यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणारा विविध घडामोडिंवर ते आपली मते रोखठोकपणे मांडतात. अनेकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.