अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचा वाद चर्चेत आला आहे. रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता, असं म्हटलं जातंय. कुठलाही गॉडफादर नसताना सुशांतने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र घराणेशाहीमुळे त्याला बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागलं अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या घराणेशाहीच्या मुद्द्यावर अभिनेते प्रकाश राजसुद्धा व्यक्त झाले आहेत.

प्रकाश राज यांनी सुशांतचा एक व्हिडीओ शेअर करत घराणेशाहीच्या मुद्द्यावर ट्विट केलं आहे.’मीसुद्धा घराणेशाहीला सामोरं गेलो आहे. त्यातून मी स्वत:ची ओळख निर्माण केली. त्या जखमा खोलवर अजूनही ताज्या आहेत. पण सुशांत सिंह राजपूत ते सहन करू शकला नाही. आपण यातून काही शिकणार आहोत का? अशा स्वप्नांचा अंत थांबवण्यासाठी आपण याविरोधात आवाज उठवणार आहोत का’, असा सवाल त्यांनी केला आहे.

आणखी वाचा : “एकमेकांची उणीधुणी नंतर काढा सर्वात आधी…”; विवेक ओबेरॉयने इंडस्ट्रीला सुनावलं

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाही, ठराविक लोकांची मक्तेदारी, नवोदितांना दिली जाणारी वागणूक यावरुन जोरदार चर्चा होऊ लागली आहे.