नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर ‘तान्हाजी’ हा सिनेमा जानेवारी महिन्यात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटातल्या एका दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. तान्हाजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये एका दृश्यात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. याच दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांच्या १४ वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. पुढच्या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमातलं हे दृश्य वगळण्यात यावं अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली आहे.  या सिनेमात अजय देवगण याने तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तसंच या सिनेमात काजोल, ल्युक केनी, सैफ अली खान यांच्याही भूमिका आहेत.

काय म्हटलं आहे प्रसाद मालुसरे यांनी ?

“तान्हाजी या सिनेमात दाखवण्यात येणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढच्या काळात ओळखला जाईल. तान्हाजी सिनेमाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र आत्तापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात असा प्रसंग घडल्याचे कुठेही वाचण्यात किंवा ऐकिवात आलेले नाही. त्यामुळे हा प्रसंगच चित्रपटातून वगळला जावा. एवढंच नाही तर या सिनेमात कोणतीही आक्षेपार्ह दृश्यं नाहीत ना? याचीही खात्री झाली पाहिजे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना दाखवण्यात यावा किंवा सिनेमाची स्क्रिप्ट वाचनासाठी देण्यात यावी” अशीही मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली आहे.

कोंढाणा जिंकण्यासाठी तान्हाजी मालुसरे यांनी लावलेली जीवाची बाजी सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. गड आला पण माझा सिंह गेला अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे वर्णन केले होते. कोंढाण्याची लढाई जिंकताना तान्हाजी मालुसरे यांना वीरमरण आलं. त्यानंतर कोंढाण्याला सिंहगड हे नाव पडलं. याच गौरवशाली इतिहासावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमातल्या दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.