28-lp-prasad-sutarचित्रपटातलं एखादं दृश्य बघून आपण आश्चर्याने तोंडात बोटं घालतो. इतकं थरारक किंवा विस्मयचकित करणारं दृश्य कसं चित्रित केलं असेल असा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या ग्लॅमरस पडद्याआड दडलेली असतात.

लौकिक शिक्षण आणि अंगभूत कौशल्य हे कायम हातात हात घालून येतंच असं नाही. कधी कधी लौकिक शिक्षण भरपूर असतं, प्रमाणपत्रांचे गठ्ठे असतात, पण क्रिएटिव्हिटीच नसते. तर कधी कधी एकदेखील प्रमाणपत्र नसतं, मात्र डोक्यात भन्नाट संकल्पना असतात, त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तांत्रिक कौशल्य असतं आणि मुळात हे सर्व करायची मनापासून आवड असते. अशा वेळी तयार होणारं रसायन हे केवळ करिअर म्हणून उरत नाही. गुलाम ते बाजीराव-मस्तानी अशा तब्बल १००हून अधिक चित्रपटांचा व्हीएफएक्सवाला म्हणून ओळख असलेला प्रसाद सुतार हा असाच अवलिया डिजिटल किमयागार या दुसऱ्या प्रकारातला आहे.

प्रसाद या क्षेत्रात अपघातानेच आला. ९७ पर्यंत तर क्रिकेट हाच त्याचा ध्यास होता, करिअर होतं. सतरा व एकोणीस वर्षांखालील गटात तो मुंबई टीमचा खेळाडूदेखील होता. पण एका छोटय़ाशा अपघातामुळे त्याला क्रिकेट सोडावं लागलं. तेव्हा आजच्यासारखी गल्लीबोळातील अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स, एसएफएक्सची दुकानं सुरू झाली नव्हती. हातात असणाऱ्या कलेमुळे डिझायनिंगच्या क्षेत्रात काम करायची इच्छा होती म्हणून पेजमेकर, कोरल ड्रॉ असं काहीबाही शिकवणारा डीटीपी ऑपरेटिंगचा कोर्स त्याने जॉइन केला १२०० रुपये भरून. प्रसाद सांगतो की, तांत्रिक शिक्षणासाठी भरलेली ही त्याची पहिली आणि शेवटची फी.

शिकत असतानाच त्याला त्याच इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवण्याचंदेखील काम मिळालं. सकाळी शिकायचं आणि संध्याकाळी शिकवायचं. चार पैसे मिळू लागलेच पण दिवसभर त्याच इन्स्टिटय़ूटमध्ये असल्यामुळे अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळत गेल्या. येथेच त्याची अ‍ॅनिमेशनची ओळख झाली. जात्याच हातात असलेली चित्रकला आणि हे तंत्र माध्यम याची चांगलीच भट्टी जमली. डिजिटल किमयागारीची प्रसादला झालेली ही पहिली ओळख. त्या एक-दीड वर्षांत त्याने अशाच काही नोकऱ्या केल्या. त्यानंतर चार-पाच जणांनी मिळून एक कंपनीदेखील सुरू केली. अनेक वेगवेगळी कामं करणारी. पण ते काही फार काळ टिकलं नाही. प्रत्येकाच्या वाटा निराळ्या होत्या, कामाचं स्वरूप वेगळं होतं आणि प्रसादला नुकत्याच सुरू झालेल्या केतन मेहतांच्या माया एंटरटेन्मेंटमध्ये प्रसादला कामाची संधी मिळाली. येथे नेमका सूर सापडला. मायामध्ये तेव्हा ‘कॅप्टन यो’ या टीव्ही मालिकेचं काम सुरू होतं. व्हिज्युअल इफेक्ट्सचं दृक्श्राव्य माध्यमातील वापराचं थेट शिक्षण मिळत गेलं.

29-lp-prem-ratan-dhanpayo

पण त्याच वेळी एक गोष्ट प्रसादला नक्की कळली होती. ‘फिल्म इज हिस्ट्री..’  चित्रपटातील काम लक्षात राहतं, इतिहासात नोंद होते, मालिकांचं जग तुलनेने मर्यादितच. त्याचा कल फिल्मकडे वाढू लागला आणि सीएमएम या कंपनीत त्याने डिजिटल कंपोझर म्हणून कामाला सुरुवात झाली. पहिलाच चित्रपट होता गुलाम. व्हिज्युअल इफेक्टस् भरपूर वापर असलेला हा चित्रपट त्याकाळी बराच चर्चिला गेला. आमिर खानने ट्रेनवर मारलेली उडी गाजली. तेव्हापासून प्रसाद आणि व्हीएफएक्स हे समीकरण बनत गेलं. डिजिटल कंपोझर ते व्हीएफएक्स सुपरवायझपर्यंतचा त्याचा प्रवास आज स्वत:च्या व्यवसायापर्यंत येऊन ठेपला आहे.

बर्फी, अग्निपथ, गुलाम, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तमाशा, रंग दे बसंती, प्रेम रतन धन पायो, रामलीला या केवळ चित्रपटांची नावंच पाहिली तरी त्याच्या एकूणच कामाची कल्पना येऊ शकते. आजवर ११८ हून अधिक चित्रपट प्रसादच्या व्हीएफएक्सने सजले आहेत.

30-lp-prem-ratan-dhanpayo

व्हिज्युअल इफेक्टसना खरा जोर आला तो चित्रीकरणात डिजिटलचा शिरकाव वाढल्यानंतर. संगणकाचा वापर वाढला आणि चित्रफितीशी खेळणं शक्य होऊ लागलं. प्रसाद सांगतो की, सुरुवातीला केवळ काहीतरी अशक्य कोटीतलं दृश्य करायचं असेल तरच व्हीएफएक्सची गरज भासणाऱ्या या इंडस्ट्रीत आज पावलापावलावर व्हीएफएक्सचा वापर होताना दिसत आहे. सुरुवातीला केवळ व्हीएफएक्सची गरज असणाऱ्या प्रसंगावरच निर्माता, दिग्दर्शक आमच्याशी चर्चा करत. मात्र आज चित्रीकरणापूर्वीच संपूर्ण स्क्रिप्ट घेऊन निर्माते आमच्याकडे येतात. हा बदल नोंद घेण्यासारखा आहे.

आज सर्वत्रच व्हीएफएक्सचा प्रभाव दिसतो. अगदी सर्वसामान्य प्रेक्षकदेखील ‘अरे हे काय कॉम्युटरवर केलं असेल’ असं म्हणताना दिसतो. पण हे नेमकं कसं केलं जातं याबद्दल अनेकदा आपण अनभिज्ञ असतो. प्रसाद सांगतो की, चित्रपटाचं स्क्रिप्ट एकदा तयार झालं की, निर्माता आणि दिग्दर्शक आमच्याकडे येतात. त्यांनी स्क्रिप्ट लिहितानाच काही ठरावीक प्रसंगासाठी व्हिज्युअल इफेक्टस् गृहीत धरलेले असतात. आम्ही त्या प्रसंगावर विचार करतोच, पण पटकथा वाचून आणखीन कोणत्या ठिकाणी व्हीएफएक्स वापरता येतील याबद्दल सूचना करतो. त्यावर चर्चा होते. आपली चित्रपट इंडस्ट्री ज्या पद्धतीने विकसित झाली आहे त्यानुसारच या सूचना असतात. किती प्रसंगासाठी व्हीएफएक्स वापरायचं हे एकदा ठरलं की मग बजेट ठरतं. मग चित्रीकरणाला सुरुवात होते.

अनेक वेळा प्रेक्षकांचा समज असतो की व्हीएफएक्स वापरून काहीही करता येतं. ते खरंच आहे. जे केवळ कल्पनेत पाहता येईल ते उतरवण्यासाठी केलेली संगणकीय करामत हाच मूळ गाभा आहे. पण आजघडीला व्हीएफएक्सचा आधार घेऊन असं संपूर्ण संगणकीय करामती करून केलेला चित्रपट कमीच असल्याचं प्रसाद नमूद करतो. त्याउलट हल्ली एखादा प्रसंग साकारण्यात भौगोलिक अथवा अन्य काही अडचणी असतील, एखाद्या घटकाची कमतरता असेल तर व्हीएफएक्सचा वापर होतोच, पण चित्रीकरणादरम्यानचा खर्च आणि धावपळ कमी करण्यासाठी खूप मोठय़ा प्रमाणात होत असल्याचं प्रसाद सांगतो. व्हीएफएक्स वापरावे लागणारे प्रसंग चित्रीकरणादरम्यान क्रोमासारख्या क्ृलप्त्या वापरून चित्रित करायचे आणि नंतर संगणकीय करामतींनी क्रोमाची जागा स्क्रिप्टनुसार दुसऱ्या दृश्याने भरून काढायची अशी सध्याची रूढ पद्धत आहे. उदाहरणच द्यायचं तर रेल्वे रूळ पार करायचा आहे आणि समोरून भरधाव वेगाने रेल्वे येत आहे असा प्रसंग आहे. रेल्वे अगदी जवळ येऊन ठेपली आहे. अशा वेळी केवळ कलाकाराचाच रूळ पार करतानाचा प्रसंग चित्रित केला जातो आणि संगणकावर त्या प्रसंगात रेल्वे अ‍ॅड केली जाते. कडय़ावर उभा असलेला, त्यावरून कोसळणारा कलाकार, हवेत छत्री घेऊन उडणारं दृश्य, परदेशातील दृश्य अशी अनेक उदाहरणं देता येतील.

33-lp-dipika-ranvir

प्रसाद सांगतो की, स्क्रिप्टमध्ये हे सर्व नोंदलेलं असतं. व्हीएफएक्सची गरज असणारा प्रसंग चित्रित करताना प्रत्यक्ष चित्रीकरणस्थळी आमचा माणूस हजर असतो. कारण चित्रीकरणादरम्यान काही त्रुटी राहिल्या तर त्या नंतर संगणकावर त्रासदायक ठरू शकतात. चित्रीकरणानंतर संकलन आणि डिजिटल इफेक्टचं काम झाल्यानंतर व्हीएफएक्स करावा लागणारा भाग आमच्याकडे येतो. त्यावर आम्ही अपेक्षित व्हीएफएक्सचं काम करतो.

सोप्या भाषेत सांगायचं तर भरपूर नक्षीकाम केलेला असा एखादा कापडाचा तागा आहे असं समजू या. त्यातील ठरावीक भागातील नक्षी बदलायची आहे, तर तो तुकडा कापून काढायचा आणि त्यावर अपेक्षित नक्षीकाम करून पुन्हा त्या जागी व्यवस्थित बसवायचा.

वाचायला हे सर्व सोपं आणि सारं काही संगणकावरच तर करायचं असं वाटत असलं तरी हे काम जितकं क्रिएटिव्ह आहे तितकंच किचकटदेखील असल्याचं प्रसाद सांगतो. अगदी एखाद्या मिनिटाचा प्रसंग जरी असला तरी त्यातील प्रत्येक फ्रेमवर आणि पिक्सेलवर काम करावं लागतं. एका सेकंदात चोवीस फ्रेम या हिशोबाने साठ सेकंदांसाठी १४४० फ्रेमवर काम करावं लागतं. अगदी नजाकतीने ते जमवावं लागतं. त्यासाठी केवळ संगणक आहे म्हणून चालत नाही. सॉफ्टवेअर सारं करतंय म्हणून चालत नाही. हाती कौशल्य असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रसाद एका आणखीन महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतो, ती म्हणजे हा सर्व व्यवसाय आहे, त्यामुळे या सर्वातील बारीकसारीक गोष्टींची नोंद ठेवावी लागते. ते काम अत्यंत किचकट असतं. आमच्याकडे पाच माणसं तर केवळ हे एक्सेलशीटमध्ये नोंदी करण्याचंच काम करत असतात.

एकदा का व्हीएफएक्स काम पूर्ण झालं की प्रॉडक्शनचं काम सांभाळणारा माणूस ते सर्व मूळ चित्रणाच्या जागी नेऊन जोडतो. ते त्या प्रसंगाशी आणि कालमर्यादेशी जुळणं गरजेचं असतं. अगदी सेकंद सेकंदाचा हिशोब असतो हा. त्यानंतर क्रिएटिव्हली हे काम मूळ चित्रीकरणाला सुसंगत झालं आहे का नाही हे पाहण्याचं काम सुपरवायझरला करावं लागतं. पूर्वी पाच-पन्नास प्रसंगांसाठीच आपल्याकडे व्हीएफएक्स वापरलं जात असे. पण हल्ली हे प्रमाण हजारपेक्षा जास्त प्रसंगांसाठी केलं जात आहे, यावरून एकंदरीतच या इंडस्ट्रीची कल्पना येऊ शकेल.

खरं सांगायचं तर व्हीएफएक्सद्वारे केली जाणारी आजकालची ही कामं म्हणजे एक प्रकारे भूलच आहे. पण आपल्याकडे व्हीएफएक्सचा वापर ज्या पद्धतीने होत आहे ते पाहता अशाच प्रकारे हा व्यवसाय पुढे न्यावा लागत असल्याचं प्रसाद सांगतो. यामध्ये समाधानकारक बाब इतकीच की चित्रीकरणापूर्वीच आमच्याशी चर्चा होत असते. पटकथा वाचल्यावर सिनेमाकर्त्यांच्या सूचनेव्यतिरिक्त काही प्रसंगांसाठी आम्ही व्हीएफएक्स सुचवतो. कारण एखाद्या विविक्षित दृश्यासाठी जर विविक्षित ठिकाणी जायचं असेल, आणि तेच जर मी व्हीएफएक्सच्या माध्यमातून दाखवू शकत असेन तर त्या विविक्षित प्रसंगासाठी संपूर्ण चित्रीकरणाचा ताफा घेऊन जाण्याची गरजच उरत नाही. त्यामध्ये खर्चाची तर बचत होतेच पण त्यासाठी निर्मात्याला अथवा दिग्दर्शकाला करावी लागणारी धावपळ कमी होते. पण व्हीएफक्स करणाऱ्या तंत्रज्ञाला चित्रपटातील पटकथेच्या त्या विविक्षित दृश्याचं भान असावं लागतं. चित्रीकरणात नसलेला भाग तयार करण्यासाठी तशी दृष्टी असावी लागते. अर्थात त्याचमुळे व्हीएफएक्स सांभाळणारा तंत्रज्ञ म्हणजे केवळ तांत्रिक जादूगार न राहता तो आता असोसिएट डायरेक्टरच झाला आहे असं म्हणावं लागेल. हा एक चांगला बदल म्हणता येईल.

पण त्यामुळेच आजचा व्हीएफएक्स वापर हा निर्मात्याच्या अनुषंगाने पाहिला जात आहे. हे चित्रित करता येणार नाही मग ते व्हीएफएक्सवाला करेल. अशी एक मनोधारणा रुजली असल्याचं प्रसाद सांगतो. त्यामुळे या कामात क्रिएटिव्ह अथवा मानसिक समाधान तसं कमीच म्हणावं लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे. आपण व्हीएफएक्सने साकारलेला भाग पडद्यावर तसाच दिसत आहे हेच काय ते सध्याचं समाधान म्हणावं लागेल.

याच अनुषंगाने प्रसाद सांगतो की, आजची आपली इंडस्ट्री ही व्हीएफएक्स वापरते ती मूलत: निर्मात्याच्या गरजेनुसार. कमी खर्च, कमी मेहनत, हवा तो परिणाम हीच आजची मागणी आहे. व्हीएफएक्स हाच आधार धरून चित्रपटाची रचना तुलनेने कमीच दिसते. क्रिश थ्री, बाहुबली आणि बाजीराव-मस्तानी या अलीकडच्या काही उदाहरणांमध्ये व्हीएफएक्स हाच आधार असल्यामुळे तेथे मात्र कामाला बराच वाव मिळत आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, twitter – @joshisuhas2