News Flash

१०० रुपयांमध्ये तिकीट… सहकुटुंब नाटक पाहता यावं म्हणून प्रशांत दामलेंचा निर्णय

मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी

(फोटो सौजन्य: Facebook/PrashantDamleFans वरुन साभार)

करोना लॉकडाउननंतर नाट्यगृहे पुन्हा सुरु झाली आहेत. मात्र नवीन नियमांनुसार मर्यादीत संख्या आणि एकंदरितच नाटकांची तिकीटं ही महागडी असल्याने अनेकदा इच्छा असूनही सर्वसामन्य मराठी कुटुंबातील व्यक्ती नाटक पाहण्यासाठी जात नाही. सहकुटुंब नाटक पाहण्यासाठी जाणं म्हणजे एक हजारांहून अधिक खर्च तर केवळ तिकीटांवर होतो. हीच अडचण लक्षात घेत अभिनेते प्रशांत दामले यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला असून त्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती दामले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय.

“अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही. म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी ३०० रुपये आणि आणि २०० रुपये होता, तो आता फक्त १०० रुपये ठेवण्यात येणार आहे,” अशी घोषणा प्रशांत दामलेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलीय.

सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये दोन प्रयोगांसाठी हे दर ठेवण्यात येणार आहेत. यापैकी पहिला प्रयोग हा ‘तु म्हणशील तसं’ नाटकाचा असून तो २६ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तर दुसरा प्रयोग ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा असून तो २८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे ही सवलतीच्या दरातील तिकीटं बुकमायशो या वेबसाईटवर उपलब्ध होणार नसून थेट नाटगृहामधूनच ही सवलतीच्या दरातील तिकीटं विकत घेता येणार आहेत, असंही प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना प्रशांत दामले यांनी, “हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन,” अशा शब्द नाट्यरसिकांना दिलाय. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, ‘एकमेका सहाय्य करू अवघे उचलून धरू नाटक’ असं आवाहन नाट्यरसिकांना केलं आहे.

अनेक नाट्यरसिकांनी या पोस्टवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यावरुनच प्रशांत दामले यांनी, “मलाही हुरूप आला तुमच्या प्रतिक्रिया वाचुन,” असं कमेंट करुन म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “ही पोस्ट जेवढी व्हायरल करता येईल तेवढी करावी. म्हणजे आपल्याला जास्तीस जास्त रसिकांपर्यंत वेळेत पोचता येईल,” असं आवाहनही चाहत्यांना केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 7:37 am

Web Title: prashant damle decided to reduce the ticket rate to 100 rs for marathi play scsg 91
Next Stories
1 दिवसाआड लसीकरण
2 सलमान खानने घेतली करोना लस; पात्रतेसंबंधी नेटकऱ्यांना पडला प्रश्न
3 सलमानची भाची अलीजे करणार सनी देओलच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये एण्ट्री
Just Now!
X