बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ चित्रपटात काम करणारा अभिनेता सत्यजीत दुबेच्या आईला करोनाची लागण झाली आहे. सत्यजीतसह त्याच्या बहिणीने स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घेतले आहे. खुद्द सत्यजीतने आईला करोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

सत्यजीतने या पोस्टमध्ये गेले काही दिवस त्याच्यासाठी किती कठिण होते हे सांगितले आहे. सुरुवातीला त्याच्या आईची तब्बेत बिघडली होती. त्यांना अचानक मायग्रेन अटॅक, ताप, उल्ट्या होऊ लागल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची करोना चाचणी केली आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली.

आईला करोनाची लागण झाल्याचे सत्यजीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले. ‘गेले काही दिवस माझ्यासाठी, माझ्या आई आणि बहिणीसाठी थोडे कठिण होते. माझ्या आईची तब्बेत ठिक नव्हती. तिला मायग्रेन अटॅक, ताप आणि संपूर्ण शरीर दुखत होते. त्यानंतर आम्ही करोनाची चाचणी केली आणि ती पॉझिटीव्ह आली. नानावटी रुग्णालयात आईला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. माझा विश्वास आहे ती लवकरच ठिक होऊन घरी परत येईल. मी आणि माझी बहिण घरीच आहोत. आम्हाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

सत्यजीतने त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात ‘ऑलवेज कभी कभी’ या चित्रपटाने केली होती. त्यानंतर त्याने ‘लक लक की बात’, ‘बांके की क्रेजी बारात’, ‘प्रस्थानम’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. तसेच त्याने ‘झांसी की रानी’, ‘महाराज की जय हो’ या मालिकांमध्येदेखील काम केले आहे.