‘मुळशी पॅटर्न’ या प्रविण तरडे यांच्या चित्रपटाने राज्यभरात धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटानंतर दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु पुण्यात शिवजयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीमध्ये तरडे यांनी त्यांच्या आगमी चित्रपटाची घोषणा केली. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच होता. तसेच हे एक ऐतिहासिक कथानक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

नुकताच प्रविण यांनी त्यांच्या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित केले. या पोस्टरद्वारे चित्रपटाचे नाव ‘सरसेनापती हंबीरराव’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘नवा सिनेमा, नवा थरार\ सरसेनापती हंबीरराव. लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे आणि टीम’ असे कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते. तसेच पोस्टवर ‘तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ’ असे लिहिले आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचेच असणार आहे.

हंबीरराव मोहिते यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची वर्णी लागली आहे. मात्र या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सध्या या चित्रपटाचं काम सुरु असून जानेवारी २०२० मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.