News Flash

फ्लॅशबॅक : …आणि ‘प्रेम कैदी’ करिश्माचा पहिला चित्रपट ठरला

पडद्यावर जशा कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि 'कहानी एक नया मोड लेती है' अगदी तसेच या चित्रपटसृष्टीतही अधूनमधून घडत असते.

करिश्माला डी. रामा नायडू  निर्मित व के. मुरली मोहन राव दिग्दर्शित 'प्रेम कैदी' चित्रपटात संधी मिळाली.

दिलीप ठाकूर
पडद्यावर जशा कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि ‘कहानी एक नया मोड लेती है’ अगदी तसेच या चित्रपटसृष्टीतही अधूनमधून घडत असते म्हणूनच तर तेथे नवे काय बरे घडतयं याची उत्सुकता कायम असते. असेच एकदा १९९० साली धर्मेद्राच्या विजेता फिल्म या निर्मिती संस्थेकडून ‘बरसात’ या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताचे ग्लॅमरस आमंत्रण हाती आले. दिग्दर्शक शेखर कपूरच्या या चित्रपटाव्दारे दोन स्टार सन्स अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करणार होते. धर्मेंद्रचा धाकटा मुलगा अर्थात सनी देओलचा भाऊ बॉबी आणि रणधीर कपूर व बबिता यांची मोठी मुलगी करिश्मा.

फिल्मीस्तान स्टुडिओतील ‘बरसात’चा झगमगाटी मुहूर्त आणि त्यास हजर राहिलेले फिल्मी दुनियेतील मान्यवर याची आठवण कायमच राहणारी. अशा कल्चरचे जंगी मुहूर्त ही तर त्या काळातील चित्रपटसृष्टीची शानच! थोड्याच दिवसात लक्षात आले, ‘बरसात’च्या पहिल्या चित्रीकरण सत्राला सुरुवात झाली. पण आता सेटवर आम्हा सिनेपत्रकाराना प्रवेशबंदी आहे. शेखर कपूरला प्रायव्हसी पसंत असे. पुढच्या दोन बातम्या मात्र चक्क धक्कादायक होत्या. बबिताने आपल्या लाडक्या बेबोला अर्थात करिश्माला या चित्रपटातून काढून घेतले. शेखर कपूरने ‘बरसात’चे दिग्दर्शन सोडले म्हणून ते राजकुमार संतोषीकडे आले. त्याने व सनी देओलने ट्विंकल खन्नाची नायिका म्हणून निवड केली.

करिश्माला डी. रामा नायडू  निर्मित व के. मुरली मोहन राव दिग्दर्शित ‘प्रेम कैदी’ चित्रपटात हरीश कुमारची नायिका बनण्याची संधी मिळाली व चित्रपटाचे हैदराबाद येथे चित्रीकरण सुरु झाले. कपूर घराण्यातील पुढची पिढी अशी छोट्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय? अशाही काहींनी भुवया उंचावल्या. पण येथे चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय तो हिट की फ्लॉप हे कधीच कोणी सांगूच नये. कधी कधी प्रदर्शनपूर्व छोटा वाटणारा चित्रपट प्रेक्षकांसमोर आल्यावर एकदम मोठा होतो. ‘प्रेम कैदी’ (१९९१) चेही तेच झाले. ‘प्रेमा कैदी’ हा एका तेलगू चित्रपटाचा हा रिमेक होता. परुचुरी ब्रदर्स यांची ही गोष्ट. प्रशस्त महालात राहणार्‍या युवतीला (करिश्मा)  घरातील नोकराचा (भारत भुषण) मुलगा (हरीश)  बाहेरचे मोकळे जग दाखवतो तेव्हा तिचे मन स्वच्छंदीपणे विहार करते. ती नकळत त्याच्या प्रेमात पडते आणि कडक शिस्तीच्या पित्याचा (दलिप ताहिल) त्या प्रेमाला कडवा विरोध. मग जोरदार नाट्य संघर्ष वगैरे वगैरे टिपिकल साऊथच्या सिनेमाचा भारी मसाला. आनंद-मिलिंदच्या संगीतातील दोन तीन गाणी लोकप्रिय देखील झाली. ‘प्रीयतम्मा ओ मेरी प्रीयतम्मा…’ वगैरे.

चित्रपटसृष्टीतील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टीतील एक म्हणजे, रुपेरी पदार्पणातील चित्रपट सुपर हिट होणे. ते सुख करिश्मा कपूरला नक्कीच मिळाले. हरिश त्यानंतर काही चित्रपटातून दिसला इतकेच. करिश्माच्या प्रगती पुस्तकाबद्दल वेगळे काही सांगायलाच नको. तिचा पहिला नायक कोण हा मात्र कोड्यात टाकायला छान प्रश्न आहे. होय ना?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:05 am

Web Title: prem qaidi karisma kapoor first movie flashback by dilip thakur
Next Stories
1 Bigg Boss Marathi: विनीत भोंडेच्या डोक्यात गेली कॅप्टनशिपची हवा
2 ‘पानिपत’मध्ये सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारण्यासाठी अर्जुनने उचललं महत्त्वाचं पाऊल
3 अरुण साधूंचा ‘झिपऱ्या’ आता मोठ्या पडद्यावर
Just Now!
X