विविध विषय हाताळणारी मराठी इंडस्ट्री सध्या जोमात आहे. वेगवेगळे विषय, त्यांची कलात्मक पण तितक्याच सुबकतेने मांडणी करून मराठीच नव्हे तर इतर भाषांतही आपला वेगळा ठसा उमटवित आहे. याच वेगळ्या विषयाच्या विश्वातील पुढचे पाऊल म्हणजे “प्रेमासाठी coming सून”. प्रेम, उत्कंठा, रोमांच, साहस अशा विविध पैलुंनी साकारलेला असा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.

आदित्यचे अंतरावर जीवापाड प्रेम असते. लग्नाच्या  दुसऱ्याच दिवशी अचानक कुणाला काहीही न सांगता अंतरा घरातून गायब होते. तिथेच चित्रपटाची खरी सुरुवात होते. अंतरा गायब होण्यामागे काय कारण आहे, या प्रश्नाने सैरभैर झालेला आदित्य जेव्हा याचा माग काढतो तेव्हा तो हादरतो. अंतराच्या गायब होण्यामागचे रहस्य काय? कोण फसवतं आदित्यला? अंतरा की आणखी कोणी? अंतरा आदित्यवर खरेच प्रेम करते की त्याचा वापर करते? गँगस्टर आदित्यच्या मागे का लागतो? अंतरा आदित्यच्या प्रेमाला मुकते की आदित्यचे प्रेम अंतराला त्याच्याकडे परतायला भाग पाडते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तूम्हाला चित्रपट प्रदर्शित झाला की मिळणार आहेत.पण, त्याकरता तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.   
फक्त दिग्दर्शक महेश मांजरेकर   यांच्या चित्रपटांसाठी आणि त्यांच्याच   प्रॉडक्शनसाठी कॅमेरामन म्हणून काम करणारे अजित रेड्डी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊस आणि   बॅनरअंतर्गत काम करत आहेत.   आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे, जितेंद्र जोशी, विजय पाटकर, रेशम टिपणिस, सुहास जोशी, आंचल पोदार हे या चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत. त्यांच्याभोवतीच चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चिन्मय कुलकर्णी यांची असून संजय संकला चित्रपटाचे संकलन करणार आहेत. चित्रपटासाठी  चेतन डांगे यांनी  साजीशी गाणी लिहिली असून त्यास पंकज पाडगहन  यांनी  संगीत दिले आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उमेश जाधव यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई, पुणे आणि राजगुरूनगर येथे होत आहे. मराठीतील नव्या प्रयोगाच्या यादीतील पहिला थ्रिलर, रोमॅन्टिक, साहसी असा चित्रपट  “प्रेमासाठी coming सून” लवकरच तुमच्या भेटीस येईल .