19 September 2020

News Flash

‘स्वत:ला सिद्ध करण्याचं दडपण’

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपटातून सारा पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने.. 

(संग्रहित छायाचित्र)

बॉलीवूड अभिनेता म्हणून सैफ अली खानलाही जितकी लोकप्रियता इतक्या वर्षांत मिळाली नसेल तितकी किंवा त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच लोकप्रियता त्याच्या दोन्ही मुलांच्या वाटय़ाला आली आहे. एकीकडे सैफ आणि करीनाचा मुलगा तैमूर अली खान हा समाजमाध्यमांचे एकमेव आकर्षण आहे तर दुसरीकडे सैफची मुलगी सारा अली खान बॉलीवूडमध्ये लागोपाठ प्रदर्शित होणाऱ्या दोन चित्रपटांतून पदार्पण करत आहे. तैमूर आणि सारा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असले तरी या दोघांचीही तुलना आणि त्यांच्यावरचे प्रश्न हा सगळा रोख सैफबरोबरच साराकडेही वळला आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपटातून सारा पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने..

आपल्या मुलांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये, विशेषत: साराने. सारा अभ्यासात जात्याच हुशार असल्याने तिने वेगळ्या क्षेत्रात काही तरी करावं अशी सैफची इच्छा होती. त्याने तशी ती बोलूनही दाखवली होती. मात्र साराने आपल्या आई-वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत बॉलीवूडची वाट धरली आहे. सध्या एकापाठोपाठ एक मुलाखती देणारी सारा ही लाजरी बुजरी नाही. खानदानी अभिनयाच्या वारशाचं दडपण नाही तर त्यामुळे वाटणाऱ्या अभिमानाचं आव्हान आहे. आत्मविश्वास आणि विचारांत स्पष्टता आहे हे सहज जाणवते. ‘केदारनाथ’ आणि त्यानंतर येणाऱ्या ‘सिंबा’ चित्रपटातून प्रेक्षकांना बॉलीवूडच्या एका नव्या अभिनय लावण्याची अदाकारी पाहायला मिळणार आहे.

चार वर्षांची असतानाच तिने अभिनेत्री व्हायचं ठरवलं होतं. लहानपणीच दूरचित्रवाणीवरच्या जाहिराती बघून अभिनय करायची, जाहिरातीतले संवाद वेगळ्या प्रकारे बोलून बघायची. सारा योग्य तेवढंच बोलते आणि योग्य तेच करतेय असा तिचा तोरा पदार्पणातच दिसतोय. कोलंबिया विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी घेतलेली सारा अभिनयाबरोबर अभ्यासातही तितकीच रमते. तरीही अभ्यासापेक्षा अभिनय जास्त जवळचा का वाटतो? असे विचारले असता ती म्हणाली, दिग्दर्शकाने अ‍ॅक्शन म्हटल्यावर तुम्ही कोण आहात हे विसरून जाता आणि त्या कथेतली व्यक्तिरेखा जगू लागता आणि कट म्हटल्यावर भानावर येता. अभिनय करताना तुमच्या आजूबाजूचं वलय विसरून तुम्ही एक व्यक्तिरेखा जिवंत करत असता. हे सगळं अनुभवणं मला नेहमीच हवंहवंसं वाटायचं. रोजच्या माझ्या आयुष्यात मला जे करायला मिळत नाही, जे अनुभव घेता आले नाहीत ते अभिनयामुळे घेता येतात. मात्र शिक्षणही तितकंच महत्त्वाचं होतं, आहे. शिक्षणामुळं वेगळ्या विषयांची जाण आणि आत्मविश्वासाने स्वतचे निर्णय स्वत घेण्याची क्षमता माझ्या अंगी आली.

लहानपणापासून आजवर माझ्या आजूबाजूला नेहमी माझ्या माणसांचा गोतावळा असतो. ते नसतील तर मी त्यांच्याकडे जाते. पण एकटी राहायची सवय नव्हती. चित्रपटाच्या निमित्ताने किती तरी वेळ व्हॅनिटी व्हॅनमध्ये एकटं राहून भूमिकेचा विचार करायची सवय लागली. एक अभिनेत्री म्हणून समाजमाध्यमांच्या या वाढत्या पसाऱ्यात सतत देखावा करणं मला आवडत नाही, पण लवकरच समाजमाध्यमांवरही प्रेक्षकांबरोबर संवाद साधणं सुरू करणार  आहे. अभिनयाच्या बाबतीतही अभिनेत्री श्रीदेवी माझे प्रेरणास्थान आहे. आजच्या नवोदित कलाकारांक डे समजूतदारपणा हवा. मी स्वतही दुसऱ्याचं नीट ऐकून घेते आणि ते समजून घेऊन त्यानंतरच व्यक्त होते. त्यामुळे एक तर सातत्याने तुम्हाला नवीन शिकत राहता येतं. अभिनयाचा खानदानी वारसा मिळाल्याचं अवघडलेपण नाही पण सध्या तरी स्वतला सिद्ध करण्याचं दडपण जास्त आहे. ‘स्टार मुलं’ ही संकल्पना मान्य नाही. तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला पुन्हा नवी संधी मिळेल. स्टारडमपेक्षाही आयुष्य भरभरून जगता आलं पाहिजे आणि आत्तापासून आपण त्याचा जाणीवपूर्वक अवलंब करत असल्याचेही सारा म्हणाली.

माझ्या आईने (अमृता सिंग) मला खूप सुरक्षित वातावरणात वाढवलं, तिने कुठलीच कमतरता भासू दिली नाही.  शिक्षणासाठी तीन र्वष घरच्यांपासून दूर राहिले तेव्हा खूप गोष्टी शिकले. आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही, हेही अनुभवलं. आई-वडील दोघेही बॉलीवूडचे स्टार कलाकार असले तरी आता अभिनय क्षेत्रात पाऊल टाकताना तुम्ही कोण आहात? तुम्ही काय करू शकता? हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे, असे तिने सांगितले.

खरं तर इतर स्टार कलाकारांप्रमाणेच सारालाही ‘धर्मा प्रॉडक्शन’मधून पदार्पण करायची इच्छा होती. मात्र ‘सिम्बा’ हा तिचा दुसरा चित्रपट ठरणार असून तो ‘धर्मा प्रॉडक्शन’चा चित्रपट आहे. ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट पाहिला तेव्हाच अभिनेत्री करीना कपूरची चाहती झाले होते. करीना खूप चांगली मैत्रीण आहे. करीनाने अभिनेत्री म्हणून ज्या प्रकारे व्यावसायिकता जपली आहे तसे या क्षेत्रात करता आले पाहिजे, असं सारा म्हणाली.

‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन्ही चित्रपटांच्या पटकथा वाचल्यावर यातील भूमिका साकारू शकते, हा विश्वास वाटला तेव्हाच चित्रपटांसाठी होकार दिला. चित्रपट निवडीच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आई-बाबांनीही मदत केली. हे दोन्ही चित्रपट निर्मितीपासून आशयापर्यंत सगळ्याच गोष्टींत वेगळे आहेत आणि त्याचा प्रत्यय या दोन्ही चित्रपटांच्या सेटवर गेल्यावर आला. मात्र या क्षेत्रात सुरुवातीलाच अशा दोन वेगळ्या चित्रपटांतून काम करायला मिळाल्याचा आनंद आहे. माझा भाऊ इब्राहिम खूप शांत आहे. मोजकंच बोलतो, पण छान सल्ले देतो. तो एकदा मला म्हणाला, तुझा अभिमान वाटतो. त्याक्षणी मला खूप आनंद झाला. तैमूरशी खेळण्यातही वेगळा आनंद मिळतो. तैमूरचे आणि माझे डोळे सारखे आहेत. तो मला ‘गोल’ अशी हाक मारतो. त्याच्यातलं निरागस सौंदर्य बघून जगाचा विसर पडतो, असं साराने सांगितलं.

आई-वडील या व्यवसायात असल्याने तुमची वाटचाल सोपी होईल असं नाही. मी या क्षेत्रात आले याचा माझ्या आई-वडिलांना आनंदच आहे. या क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी मला कधीच विरोध केला नाही. उलट मला आरसा दाखवण्याचं काम केलं. आपली आवड आणि व्यवसाय यातील समतोल साधायला शिकवलं.

– सारा खान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:22 am

Web Title: pressure to prove yourself says sarah ali khan
Next Stories
1 ‘प्रादेशिक चित्रपट ही संकल्पना नष्ट होईल’
2 एका लग्नाची पुढची गोष्ट हास्यस्फोटक!
3 पडद्यामागील कलाकार
Just Now!
X