मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन दोन महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जॉर्डनला गेला होता. पण करोनामुळे भारतात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आणि तो तेथेच अडकला होता. आता अखेर दोन महिन्यांनंतर तो मायदेशी परतला असल्याचे समोर आले आहे.
दोन महिन्यांपूर्वी पृथ्वीराज ‘आदुजीवथिम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जॉर्डनला गेला होता. करोना व्हायरसचा वाढता फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यामुळे तो जॉर्डनमध्ये चित्रपटाच्या ५८ क्रू मेंबर सोबत अडकला होता. त्याचे भारतात येण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. पण आता तो दोन महिन्यांनंतर तो भारतात परतला आहे.
मायदेशी परतताच पृथ्वीराजने त्याच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये कोची विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने तोंडाला मास्क लावले आहे, हातात ग्लोज घातले आहेत. हा फोटो शेअर करत मी परत आलो आहे असे त्याने कॅप्शन दिले आहे.
यापूर्वी चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी पृथ्वीराज जॉर्डनमध्ये अडकल्याची माहिती दिली होती. ‘अभिनेता पृथ्वीराज चित्रपटाच्या ५८ क्रू मेंबरसोबत जॉर्डनमध्ये अडकला आहे. करोना व्हायरसमुळे त्यांना भारतात परत येणे शक्य होत नाही. याबाबत केरळच्या मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आले आहे’ असे त्यांनी ट्विट करत सांगितले होते.