नव्या कृषी कायद्यांविरोधात देशातील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. देशभरातील शेतकरी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला अनेक नामांकित कलाकारांनी देखील पाठिंबा दिला आहे. मात्र या सर्वांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिने शेतकऱ्यांना फुड आर्मी म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र तिचं हे ट्विट काही भारतीय नेटकऱ्यांना आवडलं नाही. परिणामी सध्या तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

“आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे” अशा आशयाचं ट्विट करुन प्रियांकाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र तिच्या या ट्विटवर सध्या टीका केली जात आहे.

प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मात्र अमेरिकेत राहून ती भारतातील समस्यांवर ट्विट करते. इतर कलाकारांप्रमाणे ती स्वत: कधी आंदोलनात सहभाग घेत नाही. या पार्श्वभूमीवर तिचं हे ट्विट पाहून काही नेटकरी संतापले आहेत. “तुला खरोखर शेतकऱ्यांबद्दल आदर असेल तर इथे येऊन आंदोलनात भाग उगाच ट्विट करुन केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करु नकोस.” अशा आशयाची ट्विट्स करुन काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला विरोधकांचा पाठिंबा

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या मंगळवारच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह विरोधकांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला. विरोधकही मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.