प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा गेल्याच महिन्यात साखरपुडा झाल्याच्या चर्चा होत्या. पण, दोघांनी आतापर्यंत या वृत्ताला कधीही दुजोरा दिला नाही. त्यानंतर भारतात चित्रिकरणासाठी आलेल्या प्रियांकानं छायाचित्रकारांपासून साखरपुड्याची अंगठी लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नुकत्याच पार पडलेल्या पार्टीत प्रियांकानं स्वत:हून आपली साखरपुड्याची अंगठी अनेकांना दाखवली. अनेकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या अंगठीची किंमत मुंबईतील आलिशान घराच्या किंमती एवढी असल्याचं समजत आहे.

हॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध मासिकाच्या मते या अंगठीची किंमत तब्बल १ कोटी ४० लाखांहूनही अधिक असल्याचं समजत आहे. Tiffany & Co या आलिशान ब्रँडची ही अंगठी आहे. ही अंगठी विकत घेण्यासाठी निकनं उशीरापर्यंत दुकान सुरू ठेवण्याची विनंती केली होती अशाही चर्चा होत्या. प्रियांकाच्या ३६ व्या वाढदिवशी निकनं लंडनमध्ये तिच्याशी साखरपुडा केला असं म्हटलं जातं आहे.

पण अद्यापही दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला नाही. प्रियांकाला एका कार्यक्रमात याबद्दल विचारलं होतं, मात्र वैयक्तिक आयुष्याविषयी उत्तर देण्यास मी बांधिल नाही असं उत्तर तिनं दिलं. तर दुसरीकडे निकच्या चाहत्यांनी त्याला साखरपुड्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्यानं या शुभेच्छांचा स्वीकारही केला. १८ ऑगस्टला निकचा २६ वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं प्रियांकानं मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीत प्रियांका आणि निक आपल्या साखरपुड्याची औपचारिक घोषणा करतील असंही म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे निकचं संपूर्ण कुटुंब या पार्टीसाठी भारतात येणार आहे.

दरम्यान विराटनंही अनुष्कासाठी इतकीच महागडी अंगठी खरेदी केली होती. ऑस्ट्रियाच्या एका प्रसिद्ध डिझायनरकडून विराटनं अनुष्कासाठी अंगठी तयार करून घेतली होती या अंगठीची किंमत १ कोटींहून अधिक होती. अनुष्कासाठी मनाजोगी अंगठी निवडण्यासाठी विराटनं तीन महिने घेतले होते.