आपली जागतिक प्रतिमा कशी जपायची हे प्रियांका चोप्राला चांगलेच माहित आहे. हे फक्त रेड कार्पेटवर चालण्यापासून ते आंतरराष्ट्रीय चॅट शोमध्ये जाण्यापर्यंतच मर्यादित आहे असे नाही. ही बॉलिवूड अभिनेत्री आपल्या प्रतिमेचा वापर काही चांगल्या कामांसाठीही करताना दिसत आहे. नुकताच प्रियांकाने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यात ती एका गंभीर मुद्यावर बोलताना दिसत आहे.

युद्धजन्य वातावरणात राहत असलेल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न तिने यात मांडला आहे. लहान मुलांच्या मदतीसाठी तिने प्रत्येकालाच आव्हाहन केले आहे. या व्हिडिओत युनिसेफकडून सांभाळल्या जाणाऱ्या कुपोषित मुलांच्या मदतीसाठी तिने मदतीचा हात मागितला आहे. प्रियांका सध्या अमेरिकेतल्या ‘क्वांटिको’ या टीव्ही मालिकेत काम करत आहे. तसेच ‘बेवॉच’ या हॉलिवूटपटातूनही ती लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

३४ वर्षीय अभिनेत्री प्रियाकां, गेल्या अनेक वर्षांपासून यूनिसेफसाठी काम करत आहे. तिला मुलांच्या अधिकारांसाठी २०१० ते २०१६ पर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यूनिसेफ गुडविल ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनवण्यात आले होते. याशिवाय तिने वातावरण, आरोग्य, शिक्षा आणि महिलांचे अधिकार यांच्यासाठीही काम केले आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाने आपल्या चाहत्यांकडून मदतीचा हात मागितला आहे. फार मोठा मेसेज किंवा बोजड शब्द न लिहिता तिने अगदी साध्या शब्दात मला तुझी गरज आहे असेच म्हटले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यूनिसेफच्या या अभियानाची लिंकही शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/BP-Yt2fDZ90/

यूनिसेफच्या मते, साधारणतः जगभरात ७.५ कोटी मुलं ही कुपोषणाची शिकार झाली आहेत. ४८ देशात, सीरियापासून यमनपर्यंत आणि इराकपासून ते दक्षिणी सूडान, नायझेरियापर्यंतच्या मुलांवर सरळ हल्ला केला जातो. यूनिसेफशिवाय प्रियांका अन्य सामाजिक संस्थांशीही जोडली गेली आहे. स्वच्छता अभियानातही ती सक्रीय असते. याशिवाय ती पेटासाठीही काम करते. काही दिवसांपूर्वी हार्पर बाजारने आतापर्यंत १५० सर्वात फॅशनेबल महिलांची यादी जाहीर केली होती.

या यादीत द न्यू गार्ड या विभागात प्रियांका चोप्राच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तिच्यासोबत ब्री लार्सन, डकोटा जॉनसलन, एमिलिया क्लार्क, मार्गोट रॉबी आणि गल गेडॉट यांच्या नावाचाही सहभाग आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर प्रियांकाला आपला आनंद लपवता आला नाही. तिने यासंदर्भात ट्विट करत हार्पर बाजारचे आभार मानले. ती म्हणाली की, धन्यवाद हार्पर बाजार मला १५० फॅशनेबल महिला आणि असाधारण ग्रृपमध्ये सामाविष्ट करुन घेतल्याबद्दल.