|| प्रियांका तुपे

परीकथांमधली पात्रं, तसंच कथानक, धम्माल संगीतासह तितकाच कमाल नाच करत गिट्टू बिट्टू प्रेक्षकांशी(लहानग्या)गप्पा मारतात. ते आपल्या बाल प्रेक्षकांना प्रश्न विचारतात, त्यांची मतं विचारतात आणि प्रेक्षकांसोबत नाटक करतात. ‘गिट्टू’ हे ‘गुड टच’ या पात्राचं टोपणनाव किंवा छोटं केलेलं नाव आणि अगदी तसंच ‘बिट्टू’ हे ‘बॅड टच’ या पात्राचं नाव. गिट्टू बिट्टूसोबत यात आहे तो ‘पम्मी’ आणि ‘पुचकू’.

हे चौघे मित्र, त्यांच्यातला संवाद, परिकथांबाबत त्यांच्या असलेल्या कल्पना (ज्या बहुतांशी सामान्यांच्या असतात.) यातून नाटकाची गोष्ट पुढे सरकते. ‘रॅपुन्झेल’सारखी परीकथांमधील अजरामर पात्रं इथे भेटतात. चांगला स्पर्श आणि नकोसा ( किळसवाणा) स्पर्श म्हणजे काय? मैत्रीच्या नात्यातल्या या स्पर्शाबाबतीतल्या सीमारेषा, जवळच्या व्यक्तीकडून झालेल्या नकोशा स्पर्शानेही लहान मुलांच्या मनाची होणारी घुसमट या बाबींवर बोलत- प्रेक्षकांना त्यात सामावून घेत नाटक पुढे सरकतं. यातल्या पम्मीचं लहानपणी लैंगिक शोषण झाल्याने आणि त्याने ती गोष्ट आजवर कुणालाही सांगितली नसल्याने त्याच्या मनस्वास्थ्यावर झालेला परिणाम, त्याची अस्वस्थता आणि ही गोष्ट तो जेव्हा त्याच्या मित्रांना सांगतो, तेव्हा त्याचे मित्र त्यावर काय प्रतिक्रिया देतात, त्याला समजून घेतात का?, याची ही गोष्ट आहे. या नाटकातलं आणखी एक मुख्य पात्र म्हणजे वडाचं झाड – ज्याच्यापाशी पम्मी आपलं सगळं काही शेअर करतो, अगदी ज्या गोष्टी तो आपल्या आईबाबांना सांगू शकत नाही त्या गोष्टीही तो वडाच्या झाडाला सांगू शकतो. वडाच्या झाडाचा ‘श्रोता’ म्हणून केलेला  प्रतीकात्मक वापर आजच्या पौंगडावस्थेतील पिढीच्या मनातला कोलाहल, त्यांच्या समस्या किती गुंतागुंतीच्या आहेत आणि  म्हणूनच त्यांना आश्वासकपणे ऐकून घेणारं कुणी तरी हवं आहे, याचं निर्देशक आहे.

परीकथांच्या शैलीचा वापर करत लेखिका नेहा सिंगने या नाटकात जान आणली आहे आणि दिग्दर्शिकेनेही काही जागांचा वापर करत, नर्मविनोदी शैलीत लिंगभेदभावी धारणांवर (जेंडर स्टिरियोटाईप्सवर) कोरडे ओढले आहेत. मुलं कधीच रडत नाहीत, मुली रडतात. मुलांना निळा रंग आवडतो आणि मुलींना गुलाबीच रंग आवडतो या आणि अशा काही लिंगभेदभावी धारणा आपल्या समाजात, मुलामुलींमध्ये लहानपणापासूनच घट्ट रुजवल्या जातात. या धारणांवर विनोदी अंगाने केलेलं भाष्य विचार करायला लावणारं आहे. नेहा सिंग या स्त्रीवादी लेखिकेचं वैशिष्टय़ हे म्हणायला हवं की ती जुन्याच गोष्टींचा आजच्या संदर्भात, उदारमतवादी मूल्यांच्या चौकटीत विचार करते, प्रस्थापित धारणांना प्रश्न विचारते. त्यामुळेच या नाटकातल्या परीकथांनाही आजच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. उदा., परीकथांमध्ये असं हमखास घडतं की एखादी राजकन्या एखाद्या ठिकाणी खूप अडचणींमध्ये अडकलेली असते. एक राजकुमार येतो, तिथून तिची सुटका करतो आणि तिला दूर उचलून घेऊ न जातो. हा राजकुमार त्या राजकन्येला आपल्या राज्यात घेऊन जातो आणि तिच्याशी लग्न करतो. ही झाली जुनी परीकथा. आज लिंगभावी दृष्टीकोनातून या परीकथेचा विचार केला तर अनेक प्रश्न पडतात. नेहमी राजकन्याच अडचणीत आणि दु:खी असते का? राजकुमार कधी तरी अडचणीत आहे आणि राजकन्या त्याला मदत करते आहे असं कधीच परीकथेत का घडत नाही? राजकन्येला उचलून घेऊ न जाऊ न तिच्याशी लग्न करताना, तिची इच्छा आहे का नाही, हे तिला का विचारलं जात नाही? आज कोणत्याही नात्यात संमती हा मुद्दा इतका महत्वाचा असताना, राजकन्येला तिच्या संमतीशिवाय उचलून नेणारा राजकुमार हे परीकथेतलं पात्रं आधुनिक मूल्यांच्या संदर्भात कालबाह्य झालेलं आहे. संकुचित आणि लिंगभेदभावी धारणांना प्रश्न करताना आपण कोणतं तरी प्रबोधन करतोय असा लेखिका-दिग्दर्शिकेचा अभिनिवेश नाही. अगदी साध्यासोप्या विनोदी संवादांनी ही कमाल साधली आहे.

नाटकात वंदना भूषणने साकारलेली गिट्टू तर रिषभ कामदारने साकारलेली बिट्टूची भूमिका प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत, विचारही करायला लावते. सहज हैराज या गुणी कलाकाराने साकारलेला पम्मी तर निव्वळ अप्रतिम. पम्मीच्या अस्वस्थतेशी आपण सगळेच रिलेट करु शकतो आणि तितकीच चुलबुली पुचकू ही व्यक्तिरेखा साकारलेली प्रियांका कोतवालही प्रेक्षकांना भावते. या सगळ्या कलाकारांची मस्त भट्टी जमवत याचं नेटकं दिग्दर्शन रसिका आगाशेने केलं आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये सतत नवं धुंडाळण्याचा रसिकाचा प्रयत्न असतोच, पण विषय हलक्याफुलक्या आणि तितक्याच संवेदनशीलपणे हाताळण्याची तिची हातोटीही खास आहे. वर्षां भावेंनी दिलेलं संगीत ही या नाटकाची आणखी एक उत्तम बाजू. अबालवृद्धांना  ठेका धरायला लावणारी गाणी आणि मोजकं परिणामकारक संगीत आशयाचा परिणाम आधिक गडद करतं. तितकीच परिणामकारक प्रकाश योजना सचिन लेले यांनी केली आहे. हे ‘हिंग्लिश’ लवकरच मराठीतही करणार असल्याचं दिग्दर्शिका रसिका आगाशेनं सांगितलं.  लहान बालकांसोबत घडणाऱ्या लैंगिक अत्याचार, गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पॉक्सो (लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम ) कायद्यात अलीकडेच बदल करण्यात आले आहेत. १२ वर्षांखालील बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अपराधींसाठी फाशीच्या शिक्षेचं प्रावधान करण्यात आले आहे तर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने जिथे शंभरपेक्षा अधिक खटले सुनावणीसाठी प्रलंबित आहेत, तिथे विशेष न्यायालय उभारण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. या बाबी असे गुन्हे घडून गेल्यानंतर काय करायचं, याबाबतच्या आहेत, शिवाय फाशीच्या शिक्षेने असे गुन्हे कमी होतील का? हाही एक प्रश्न आहेच. मात्र बालकांचे लैंगिक शोषण होऊ नये याकरता त्यांच्याशी संवाद साधणे, लैंगिक शिक्षण हे दीर्घकालीन उपाय आहेत. लिंगभाव प्रशिक्षण कार्यशाळा, लैंगिक शिक्षण सर्वच बालकांसाठी धोरणात्मक पातळीवर उपलब्ध होण्याची शक्यता सध्या धूसर आहे. त्यामुळे अशा विषयांबद्दल पालक आणि बालकांमध्ये संवादाची एक मोठी पोकळी आहे अशा वेळी ‘गिट्टू बिट्टू’सारखं नाटक ही पोकळी भरुन काढतं.