वर्षभराच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर स्थिरावत असतानाच कॉमेडिअन कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूची कपिलनं पाठराखण केली होती. मात्र हे प्रकरण त्याला भोवलं. आता चाहत्यांनी सिद्धूची पाठराखण करणाऱ्या कपिलकडे आपला मोर्चा वळवला आहे. कपिलवरही बंदी घालण्याची मागणी चाहते करत आहेत. तर दुसरीकडे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे निर्माते अशोक पंडित यांनी देखील कपिल शर्मावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

‘तू द कपिल शर्मा शोचा निर्माता आहेस. सिद्धूची पाठराखण करणाऱ्या कपिलवर तू काय कारवाई करणार’ असा सवाल अशोक यांनी ट्विट करत सलमान खानला विचारला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढण्याचा सल्ला देणाऱ्या सिद्धूवर नेटकऱ्यांनी कडाडून टीका केली होती. सोशल मीडियावर सिद्धूला कार्यक्रमातून काढून टाकण्याची मागणीही जोर धरू लागली. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून सिद्धूची वाहिनीनं गच्छंती केली. या सर्वप्रकरणानंतर सिद्धूला कार्यक्रमातून काढून टाकणं हा तोडगा असू शकत नाही अशा शब्दात कपिलनं सिद्धूची पाठराखण केली होती. मात्र आता सिद्धूनां पाठीशी घालणं कपिलला भोवलं आहे.

सोशल मीडियावर #BoycottKapilSharma हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पण त्याचबरोबर सलमान खानवरही कपिल शर्मावर कारवाई करण्यासाठी नेटकरी दबाव टाकत आहे. आता ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता सलमान यावर काय कारवाई करतो हे पाहण्यासारखं ठरेल .