ऑनस्क्रीन खलनायकाची भूमिका साकारणार सोनू सूद रिअल लाइफमध्ये अनेकांचा हिरो ठरला आहे. लॉकडाउनच्या काळात गरजुंना मदत करत सोनू सूदने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सध्या सोनू सूद हे नाव नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय झालं आहे. मात्र आज लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याचा कलाविश्वातील प्रवास काही सोपा नव्हता. एका मुलाखतीमध्ये त्याने पहिल्या चित्रपटाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. यात पहिल्याच चित्रपटासाठी त्याला शर्टलेस व्हावं लागलं होतं असं त्याने म्हटलं आहे.

पहिल्याच चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या सोनू सूदला निर्मात्यांनी शर्टलेस होऊन बॉडी दाखवण्यास सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्याची बॉडी पाहून त्याला पहिला चित्रपट मिळाला असं सांगण्यात येत आहे.

“मी मुंबईत पोहोचलो आणि तिथूनच माझ्या संघर्ष काळाची, स्ट्रगलची सुरुवात झाली. मी रोज एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये अशा फेऱ्या मारत होतो. माझे फोटो त्यांना दाखवत होतो. पण सतत रिजेक्ट होत होतो. त्यावेळी मुंबईचे रस्ते पायदळी तुडवण्यातच माझे १- २ वर्ष निघून गेले. त्यामुळे माझ्या करिअरची सुरुवात कुठून होणार हा प्रश्न सतत सतावत होता. त्यावेळी तामिळ भाषेचा एक कॉर्डिनेटर होता. त्याला माझे फोटो आवडले आणि त्याने मला चेन्नईला बोलवून घेतलं. त्याच्या एका फोनवर मी चेन्नईला पोहोचलो आणि पहिला चित्रपट साईन केला”, असं सोनू सूदने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “मला निर्मात्यांनी भेटायला बोलावलं आणि माझी शरीरयष्टी पाहून ती चित्रपटासाठी योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्यांनी प्रथम मला शर्टलेस व्हायला सांगितलं. त्यानंतर तुझी शरीरयष्टी अगदी योग्य आहे. आम्ही तुझ्यासोबत काम करु असं निर्मात्यांनी सांगितलं”.

दरम्यान, सोनू सूदने आजपर्यंतच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं असून तो खलनायक म्हणून अनेकांच्या पसंतीत उतरला आहे. तसंच बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही त्याची तुफान क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं.