बंगळुरुत सध्या अभिनेत्री सनी लिओनीविरोधात वातावरण तापलं आहे. सनी लिओनीला ‘वीरमादेवी’ चित्रपटात घेण्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातून सनी लिओनी तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मात्र राज्यभरात सुरु असलेल्या निदर्नशनांमुळे चित्रपटाच्या रिलीजवर टांगती तलवार आहे. सनी लिओनीला चित्रपटातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. हा चित्रपट चोल साम्राज्याचे शासक राजेंद्र पहिले यांची पत्नी वीरमादेवी यांच्या जीवनावर आधारित आहे.

हिंदू संघटना कर्नाटक रक्षण वैदिकेच्या कार्यकर्त्यांनी सनी लिओनीला ‘वीरमादेवी’ चित्रपटात घेण्याला विरोध केला असून ठिकठिकाणी लागलेले पोस्टर्स फाडले आहेत. तसंच सनी लिओनीविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटक रक्षण वैदिकेचे कार्यकर्ते हरिश यांनी आमचा सनी लिओनीने वीरमादेवी यांची भूमिका निभावण्याचा पूर्ण विरोध आहे. वीरमादेवी यांचं एक ऐतिहासिक महत्त्व असून सनी लिओनीला ती भूमिका न देता, तिला चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सनी लिओनी चित्रपटात दक्षिण भारताची वीरांगणा वीरमादेवी यांची भूमिका निभावणार आहे. मात्र काही संघटनांचा पॉर्न इंडस्ट्रीशी संबंध असलेल्या अभिनेत्रीने ही प्रतिष्ठित भूमिका निभावण्याला विरोध आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटासाठी हजारो कोटी खर्च करण्यात आले आहेत. तसंच हॉलिवूड चित्रपट ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’चे तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करत आहेत. सनी लिओनीसोबत नवदीप देखील चित्रपटात प्रमूख भुमिकेत असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे.