चित्रपट १ मे ला प्रदर्शित; राहुल देशपांडे भूमिका साकारणार

आपल्या अभिजात गायकीने संगीत क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र प्रवाह निर्माण करणाऱ्या पं. वसंतराव देशपांडे यांचे जीवनचरित्र चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात गायक राहुल देशपांडे आपल्या आजोबांची म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. नातवाने आजोबांच्या जीवनावर केलेला हा मराठीतील कदाचित पहिलाच चित्रपट आहे.

गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘मी वसंतराव’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘वायकॉम १८’ निर्मित या चित्रपटाच्या पोस्टर आणि टिझरचे सोमवारी झाकीर हुसेन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अभिनेत्री अनिता दाते वसंतरावांच्या आईची, तर कौमुदी वलोकर पत्नीची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता पुष्कराज चिरपुटकर पु. ल. देशपांडे, तर अमेय वाघ दीनानाथ मंगेशकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून वसंतरावांचा विलक्षण प्रवास, नाटय़संगीतातील कारकीर्द आणि गायक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

याविषयी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी सांगतो, ‘वसंतराव देशपांडे सगळ्यांना ठाऊक आहेत, पण त्यांचा प्रवास मात्र अंधारात आहे. नाटकातून सुरू असलेली त्यांची कामे लोकांपर्यंत पोहचायला बराच काळ गेला. पण त्यानंतर त्यांनी जी झेप घेतली ती अवर्णनीय आहे. तोच प्रवास मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर गेली सात वर्षे या चित्रपटाचे काम सुरू होते. अभ्यासपूर्ण आणि प्रेक्षकांना आवडेल असा सिनेमा तयार झाला आहे. मालिका आणि चित्रपटातून आज अनेक चरित्रपट साकारले जात आहे. हा एकसुरीपणा नसून नव्या जुन्याचा संगम आहे, असे वायकॉम १८, मराठी मनोरंजनचे व्यवसायप्रमुख निखिल साने यांनी सांगितले.

यावेळी वायकॉम १८ चे सीओओ अजित अंधारे, वायकॉम १८, मराठी मनोरंजनचे व्यवसायप्रमुख निखिल साने, गायक-अभिनेता राहुल देशपांडे, पुष्कराज चिरपुटकर,  दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, अभिनेत्री अनिता दाते, कौमुदी वलोकर उपस्थितीत होते.

पं. वसंतराव देशपांडे यांच्या सोबत मला साथसंगत करता आली हे माझे भाग्य समजतो. वसंतराव देशपांडे यांची गायकी घराणेशाहीच्या पलीकडे जाणारी होती. सुरांवर राज्य करणाऱ्या या गायकाचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो आहे यासारखी आनंदाची बाब नाही.

– उस्ताद झाकीर हुसेन