अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. आता नाना पाटेकर यांना पुण्यातील कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे.

‘अभिनेत्री तनुश्री दत्ताने केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नानांवर आरोप केले. जर खरंच त्यांच्यावर अन्याय झाला होता तर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी होती. त्यांनी न्याय देवतेकडे न्याय मागायला हवा होता. तसं न करता त्यांनी थेट प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका मांडली. म्हणून त्यांनी केलेले आरोप संशयास्पद आहेत,’ असं मत या कलाकारांनी व्यक्त केली. पुण्यातील सारसबाग इथं कलाकारांनी चर्चासत्र आयोजित केलं होतं.

प्रत्येक पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे. पण नानांनी चित्रपट विश्वासोबतच नाम फाऊंडेशनतर्फे समाजहिताची कामेदेखील केली आहेत. नानांविरोधात हा मीडिया ट्रायल सुरू असून त्यांची मानहानी थांबवावी व न्याय पालिकेला आपले काम निरपेक्षपणे करून द्यावे अशी भूमिका कलाकारांच्या वतीने मांडण्यात आली.

यावेळी निर्माते-दिग्दर्शक शरद गोरे, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर, अभिनेते प्रकाश धिंडले, मारुती चव्हाण, अभिनेत्री माधवी गोडांबे, वनिता सोनवणे, मयुरी भालेराव, रमाकांत सुतार, पंकज भालेराव, महेश शिंदे, कुणाल निंबाळकर, मयुर जोशी, मंगेश घोडके आदी कलाकार उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी नानाच्या समर्थनात घोषणादेखील दिल्या.