तब्बल दोन वर्षांनंतर हृतिक रोशन ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिनेसृष्टीत चर्चा असलेल्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरवरून सोशल मीडियावर बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले. असाच एक मीम शेअर करत पुणे शहर पोलीस आयुक्तांनी वाहतुकीच्या दृष्टीने गमतीशीर ट्विट केले आहे. विशेष म्हणजे या ट्विटवर हृतिक व्यक्त झाला आहे.

‘जेव्हा आम्ही ट्रिपल सीट, हेल्मेटविना प्रवास आणि चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्याला पाहतो, तेव्हा आमची अशी प्रतिक्रिया असते,’ असं ट्विट करत आयुक्तांनी एक मीम शेअर केला. या मीममध्ये हृतिक ‘इतना गलत कैसे हो सकता है भाई’ असं म्हणताना दिसतोय. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी आयुक्तांनी हा मजेशीर ट्विट केला होता. हा मीम हृतिकलाही भावला आणि त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली.

वाचा : मुंबईतील मशिदीबाहेर चेहरा झाकून कार्तिक-साराने काढला सेल्फी

‘सुपर ३०’ या चित्रपटात हृतिक गरीब मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोणताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी झटणाऱ्या आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दिसणार आहे. ‘रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्स’च्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून विकास बहल यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.