पुणे : ‘पुण्यात मी लहानपणापासून येत आहे, माझ्या बॉबी, प्रेमरोग, प्रेमग्रंथ, सत्यम शिवम सुंदरम यांसह अनेक चित्रपटांचे शुटिंग पुण्यात झाले आहे. त्यामुळे पुण्याशी एक वेगळेच नात निर्माण झाले आहे, असे ज्येष्ठ सिनेअभिनेते ऋषी कपूर म्हणाले. १६व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज कपूर यांच्या चित्रपटाच्या २३ निगेटिव्ह आम्ही आजवर जपून ठेवल्या आहेत, आता तुम्ही त्या अशाच जपून ठेवाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी पुणेकरांना केले.

यावेळी व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संयोजक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, संजीव कपूर, रमेश प्रसाद, ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि गायक-संगीतकार एस. पी. बालसुब्रमण्यम उपस्थित होते. याप्रसंगी रमेश प्रसाद, रमेश सिप्पी आणि एस. पी. बालसुब्रमण्यम या सर्वांना पुणेरी पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी या तीनही मान्यवरांनी आपल्या सिनेसृष्टीतील आठवणींना उजाळा दिला.

यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, निर्जीव कोहनूर हिऱ्यापेक्षा ज्यांना आज चित्रपट सृष्टीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येत आहे. ते खऱ्या अर्थाने कोहनूर आहे. देशात जीएसटी लागू झाल्यावर अनेक राज्यातील करमणूक कर वाढला. मात्र, राज्याचा करमणूक कर वाढवण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र हे चित्रपट क्षेत्राला कायम पाठिंबा देत आले असून भविष्यातही हा पाठिंबा कायम राहिल अशा शब्दांत त्यांनी सरकारची भुमिका स्पष्ट केली.