Quantico Hindu Plotline Row: Pooja Bhatt Supports priyanka chopra. ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरिजमुळे ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा खऱ्या अर्थाने परदेशी प्रेक्षकांचीही मनं जिंकून गेली. पण, काही दिवसांपासून तिच्या या बहुचर्चित सीरिजविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या असून तिच्यावर अनेकांचाच रोष ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय वंशाचा एक व्यक्ती दहशतवादी असल्याचं या सीरिजच्या एका भागात दाखवण्यात आलं होतं.

सीरिजमधील या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. ज्यानंतर प्रियांकावर अनेकांनीच तोफ डागत तिला पाकिस्तानात पाठवण्याची मागणीही केल्याचं पाहायला मिळालं. तर कोणी तिच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली.

आपल्याला होणारा हा विरोध पाहता खुद्द प्रियांकानेही ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांची माफी मागितली. पण, तरीही तिला होणारा विरोध काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीये. विविध कारणांनी या मुद्द्याला बरेच फाटे फुटत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता अभिनेत्री, चित्रपट निर्माती पूजा भट्टने प्रियांकाला साथ दिली आहे. ‘जेव्हा प्रियांका आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करते तेव्हा तिच्या यशालाच आपण आपलं यश मानतो आणि तिच्याच चित्रपटांवर बंदी आणण्याची मागणीही करतो तिलाच काही गोष्टींबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडतो. अशा कामासाठी तिला माफी मागण्यास भाग पाडतो, जे पूर्णपणे काल्पनिक आहे, कोणा दुसऱ्याचीच संकल्पना आहे. या साऱ्या प्रकरणाविषयी आपण संकुचित मानसिकतेचा त्याग करण्याची गरज आहे असं नाही का वाटत तुम्हाला?’, असा प्रश्न पूजाने ट्विट करत उपस्थित केला.

वाचा : Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

Quantico: नेमका हा वाद काय आहे?
१ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’ सीरिजच्या भागात मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणूबॉम्बने हल्ला करण्याचा कट एक एमआयटी (MIT) प्राध्यापक रचत असल्याचे दाखवण्यात आलं होतं. हा दहशतवादी एक भारतीय असल्याचं त्यात दाखवण्यात आलं होतं. पाकिस्तानवर दोष देऊन भारतीय दहशतवादी त्या परिषदेवर हल्ला करणार असल्याचं मालिकेचं कथानक होतं. कथानकात आलेल्या याच वळणामुळे सोशल मीडियावर अनेकांनी ‘देसी गर्ल’च्या या सीरिजवर संताप व्यक्त केला होता.