‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल महिलेशी केलेल्या असभ्य वर्तणुकीमुळे चर्चेत आले आहेत. त्याच्यावर महिलेने केलेल्या छेडछाडीचा आरोपानंतर फँटम फिल्म कंपनीने त्याला घरचा रस्ता दाखविल्याचे समजते. मात्र, विकास बहलने हे वृत्त फेटाळून लावले आहे. माझ्याविरोधात अशी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे त्याने म्हटले आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केले आहेत, ती माझी चांगली मैत्रीण आहे. मी तिला कधी आणि कशा प्रकारे त्रास दिला, याबाबत विचारणा करणार आहे, मात्र सध्या माझेच शोषण होत असल्याचे त्याने म्हटले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फँटम फिल्मसोबत काम करत असणाऱ्या एका तरुणीने विकासवर छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. क्वीन चित्रपटाच्या दिग्दर्शकाने काही महिन्यापूर्वी गोव्यातील ट्रिपदरम्यान असभ्य वर्तन केल्याचे तरुणीने म्हटले आहे. तिने हा प्रकार फॅटमचे मालक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधू मेंटना यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर हे प्रकरण फँटम फिल्मसचे सहनिर्माता रिलायन्स इन्टरटेन्टमेंटपर्यंत पोहोचले. तक्रारदार महिलेची कैफियत जाणून घेण्यासाठी विशाखा समितीची नेमणूक देखील करण्यात आली. या समितीच्या निर्णयानंतर विकास बहलला कंपनीच्या पदभारावरुन निलंबित करण्यात आले.

दरम्यान, विकाससह प्रॉडक्शन मधु मंटेना यांनी ही या आरोपाचे खंडन केले आहे. ‘क्वीन’ चित्रपटाच्या दिग्दर्शकावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बहल सध्या दिल्लीमध्ये असून, त्यांने आरोप फेटाळून लावले आहे. एवढेच नाही तर, जर संबंधित तरुणीचा काही गैरसमज असल्यास तिची माफी मागण्याची तयारी देखील दर्शवली आहे.