गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा आगामी चित्रपट ‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ चर्चेत आहे. या चर्चा आर माधवनच्या या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख भूमिका साकारणार असल्यामुळे सुरु झाल्या होत्या. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून शाहरुखची झलक पाहायला मिळाली आहे.

‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ हा चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित आहे. २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नम्बी यांचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. नम्बी यांची भूमिका आर माधवन साकारताना दिसत आहे तर शाहरुख खान एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात शाहरुख खान नम्बी यांना काही प्रश्न विचारताना दिसत आहे. नम्बी हे इस्रोसाठी काम करत असतात. पण त्यांच्यावर काही गुप्त माहिती इतर देशांना पुरवल्याचा आरोप करण्यात येतो. नम्बी यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात माधवन पदार्पण करत आहे. तसेच शाहरुख या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. अनेक बॉलिवूड कलाकरांनी देखील चित्रपटाचा ट्रेलर पाहुन कौतुक केले आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा २०१८मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. आता तब्बल दोन वर्षानंतर शाहरुख या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.