बॉलिवूडचा भाईजान सलमान खान एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असं आहे. या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे.

करोनामुळे देशभरातील बहुतांश सिनेमागृह अद्याप बंदच आहेत. शिवाय करोनामय स्थिती सामान्य होईपर्यंत ते पहिल्यासारखे सुरु होतील अशी शक्यता नाही. त्यामुळे अनेक मोठ्या चित्रपटांनी सिनेमागृहांची वाट पाहण्याऐवजी OTTचा रस्ता निवडला. परंतु सलमानचा चित्रपट मात्र कुठल्याही परिस्थितीत सिनेमागृहांमध्येच प्रदर्शित होणार आहे. त्याने एका ट्विटच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

“माफ करा, सिनेमागृहांच्या मालकांसोबत चर्चा सुरु असल्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा उशीर झाला. सध्या करोनामुळे परिस्थिती फारच बिकट झाली आहे. थिएटरचे मालक आणि एक्सहिबिटर्स सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी राधे हा चित्रपट मी थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. इंशाअल्लाह २०२१ मध्ये ईदच्या मुहुर्तावरच चित्रपट प्रदर्शित होईल.” अशा आशयाचं ट्विट सलमान खानने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.