dilip thakurकाही काही माणसाना नशीब साथ देता देताच त्यासह दुर्दैवही त्याना आडवे येते… दिग्दर्शक राहुल रवैल अगदी तसाच. खरं तर दिग्दर्शक एस. एच. रवैल यांचा पुत्र म्हणून चित्रपट माध्यम व व्यवसाय म्हणजे काय हे त्याला तसे घरातूनच माहित. एस. एच. रवैल यांनी ‘मेरे मेहबूब’सारखा मुस्लिम सामाजिक चित्रपट देऊन आपला ठसा उमटवलेला. ‘संघर्ष’, ‘मेहबूब की मेहंदी’ असेही काही चित्रपट त्यानी दिले. राहुल रवैलने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताना आर. के. स्टुडिओतून टाकले. राज कपूरकडे ‘सत्यम शिवम सुंदरम’च्या वेळेस तो सहाय्यक होता. याच आर. के.चा ‘बीवी ओ बीवी’ राहुलला स्वतंत्रपणे दिग्दर्शनाला मिळाला. तो पडद्यावर येईपर्यंत रणधीर कपूरची लोकप्रियता ओसरली. राहुलने कुमार गौरवचा पहिला सिनेमा ‘लव्ह स्टोरी’चे दिग्दर्शन केले. पण चित्रपट पुर्ण होत असतानाच अभिनेता, निर्माता व कुमार गौरवचा पिता राजेन्द्र कुमारशी चित्रपटाच्या क्लायमॅक्सवरून वाद झाल्याने राहुल रवैलचे दिग्दर्शक म्हणून नावच काढले गेले व दिग्दर्शकाच्या नावाशिवाय प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. विशेष म्हणजे तो सुपर हिट झाला.

धर्मेंद्रने सनी देओलच्या रुपेरी पदार्पणसाठी दिग्दर्शक म्हणून राहुल रवैलचीच निवड केली. त्यातून ‘बेताब’ बनला. त्याची पहिली ट्रायल पाहून धर्मेंद्रने तब्बल चाळीस दिवसाचे रिशूटींग सुचवले. पिक्चर पैसो से नही दिल से बनती है हे तेव्हाचे धर्मेन्द्रचे म्हणणे आजही सांगितले जाते. राहुलच्या दिग्दर्शनातील ‘गुनहगार’मधे रिशी कपूर व परवीन बाबी अशी हिट जोडी असूनही तो मुंबईसारख्या अनेक मोठ्या शहरात प्रदर्शित झालाच नाही. ‘अर्जुन’, ‘डक्केत’, ‘योद्धा’ अशा आणखीन काही चित्रपटांबद्दल असेच काही चांगले व वाईटही आहे. त्या खेळात म्हणा वा गोंधळात त्याची कारकीर्द गुरफटून गेली. त्यानंतर दिग्दर्शक व कलाकारांचीही पुढची पिढीदेखिल आली. पण राहुल रवैल अपेक्षित उंचीपासून मात्र दुरच राहिला. अरेरे त्याच्या कर्तृत्वाला थोडीशी नशिबाची साथ मिळायला हवी होती.
दिलीप ठाकूर