रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे चर्चेत होता. हा चित्रपट कधी एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतोय याची उत्सुकता चाहत्यांना होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे. जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र याच महिन्यात ‘पद्मावत’ही प्रदर्शित होणार होता म्हणूनच चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल असं जाहीर करण्यात आलं. मात्र एप्रिलमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त सापडला असून २९ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘2.0’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक एस शंकर यांनी ‘2.0’ नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली. २०१७ मध्येच या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं होतं. मात्र वीएफएक्स आणि इतर तांत्रिक बाबींमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. ४५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयचा हा पहिलाच तामिळ चित्रपट असून या चित्रपटात अक्षय खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे अक्षयच्या भूमिकेबद्दलही अनेकांना कुतूहल आहे.
Hi everyone.. atlast the vfx companies promised the final delivery date of the vfx shots. The movie will release on nov 29th 2018.#2Point0 pic.twitter.com/ArAuo5KxM7
— Shankar Shanmugham (@shankarshanmugh) July 10, 2018
हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘एंथरिन’ चित्रपटाचा सिक्वल आहे. नोव्हेंबर महिन्यात ‘स्टुडंट ऑफ द इअर २’, ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’, ‘केदारनाथ’, ‘गुस्ताखीयाँ’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.