वादग्रस्त विधानांसाठी आणि वादग्रस्त कृत्यांसाठी नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा वाद घालण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, या वेळी मात्र वाद घालण्यासाठी तिच्याकडे सामाजिक जबाबदारी देण्यात आली आहे. ‘सिने अ‍ॅंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन’ (सिन्टा)च्या ‘वादविवाद निवारण समिती’च्या अध्यक्षपदी राखी सावंतची निवड झाली आहे. अध्यक्ष झाल्या झाल्या मालिका आणि चित्रपट निर्मात्यांबरोबर वाद घालण्याचे काम पहिल्यांदा राखीला देण्यात आले आहे.
ज्या कलाकारांना निर्मात्यांकडून पूर्ण मानधन मिळालेले नाही त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी राखी प्रॉडक्शन हाऊसेसचा सामना करणार आहे. ‘सिन्टा’च्या वादविवाद निवारण समितीची अध्यक्ष म्हणून संस्थेकडे आलेल्या तक्रारी-भांडणे मिटवणे ही तिची प्रमुख जबाबदारी असली तरी क लाकारांना मानधन मिळवून देण्याचे काम प्रामुख्याने तिला हाती घ्यावे लागणार आहे. राखीने आपण हे काम ‘सिन्टा’चे अध्यक्ष धर्मेश तिवारी यांच्या मदतीने सुरू केल्याचे म्हटले आहे. आत्तापर्यंत विविध मालिकांच्या निर्मात्यांकडून कलाकारांना उर्वरित मानधनाची १ कोटी रूपयांपर्यंतची रक्कम मिळवून देण्यात आपल्याला यश आले असल्याचेही राखीने सांगितले.