१९८७मध्ये प्रदर्शित झालेली ‘रामायण’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेच्या यशाचे श्रेय विशेषता मालिकेतील कलाकरांना जाते. बाल कलाकारांपासून ते मोठ्या कलाकरांपर्यंत सर्वांनीच अतिशय सुंदर पद्धतीने भूमिका साकारल्या आहेत. काही अभिनेत्यांना तर रामायण मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यातील एक कलाकार म्हणजे मुकेश रावल.

मुकेश रावल यांनी रामनंद सागर यांच्या रामायण मालिकेत रावणाचा भाऊ बिभीषण हे पात्र साकारले होते. मुकेश यांचे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर होते. पण पुन्हा प्रदर्शित होणारे रामायण पाहण्यासाठी ते आज आपल्यामध्ये नाहीत. १५ नोव्हेंबर २०१६ मध्ये रेल्वे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. चला जाणून घेऊया मुकेश यांच्याबद्दल..

मुकेश यांनी हिंदीसह गुजराती चित्रपटसृष्टीमध्येही काम केले. त्यांचा जन्म १९५१ साली मुंबईत झाला होता. रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत मुकेश यांनी बिभीषणाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे रावल यांना लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी ‘बिंद बनूगा, घोडी चढूंगा’ या मालिकेमध्ये काम केले होते. तसेच ‘जिद’, ‘लहू के दो रंग’, ‘सत्ता’, ‘औजार’, ‘मृत्युदाता’, ‘कसक’ य़ा चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. याशिवाय त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.

एक दिवस अचानक मुकेश यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्काच बसला. मुंबईतील कांदिवलीजवळ रेल्वे रुळावर रावल यांचा मृतदेह आढळला होता. तसेच हा अपघात होता की आत्महत्या हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.