दूरदर्शन वाहिनीने लॉकडाउनच्या काळात ९०च्या दशकातील सर्व मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला. यामधील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. रामनंद सागर यांच्या उत्तर रामायण या मालिकेचा काल शेवटचा भाग होता. शेवटचा भाग सुरु होताच ट्विटरवर #uttarramayanfinale ट्रेंड सुरु होता.

उत्तर रामायणाचा शेवटचा एपिसोड पाहून चाहते भावुक झाले. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एका युजरने, ‘हा सीन सर्वांना भावुक करणारा आहे. राजासोबत प्रजेलाही समजदार व्हावे लागणार’ असे म्हटले. तर दुसऱ्या एक युजरने हा सीन अतिशय भावनिक आहे असे म्हटले आहे.

रामायण ही मालिका सुरु होताच प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतली होती. ही मालिका पुन्हा दाखवल्यामुळे मालिकेतील कलाकारदेखील पुन्हा एकदा चर्चेत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी मालिकेने विश्वविक्रम केल्याचे समोर आले. या मालिकेने एका दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळवले आहेत.

प्रसारभारतीच्या ट्विटर पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यांनी रामायण या मालिकेला १ दिवसात ७.७ कोटी व्ह्युज मिळाल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच हा विश्वविक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल आहे. १६ एप्रिल रोजी या मालिकेला ७.७ कोटी व्ह्युज मिळाले असे त्यांनी म्हटले आहे.